दोन डझन घरे फोडणारा ‘लक्ष्या’ अखेर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 01:08 AM2017-11-03T01:08:11+5:302017-11-03T01:08:22+5:30
शहरात मागील नऊ महिन्यांपासून घरफोडीचे सत्र सुरू होते. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा अट्टल घरफोड्या ‘लक्ष्या’ला ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात मागील नऊ महिन्यांपासून घरफोडीचे सत्र सुरू होते. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा अट्टल घरफोड्या ‘लक्ष्या’ला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या कबुलीवरून पोलिसांचेही डोळे विस्फारले. लक्ष्या हा एकटाच चोरी करीत होता. त्याने तब्बल २५ घरातून साडेचार लाखांच्यावर मुद्देमाल लंपास केल्याची कबुली दिली.
लक्ष्मण ऊर्फ लक्ष्या मनोज जाधव (२७) रा. भांबोरा ता. घाटंजी ह.मु. नेताजीनगर यवतमाळ, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लक्ष्याला गोपनीय माहितीवरून गुरुवारी पहाटे नेताजीनगर परिसरात अटक केली. ‘लक्ष्या’ हा मागील काही दिवसांपासून चोरीच्या वस्तू स्वस्त दरात विकत असल्याची माहिती मिळाली होती. या आधारेच त्याला ताब्यात घेण्यात आले. बाजीरावचा प्रसाद देताच लक्ष्याने वडगाव रोड ठाण्याच्या हद्दीतील १३, तर लोहारा ठाण्यातील १२ गुन्ह्यांची कबुली दिली. यातील बहुतांश मुद्देमाल लक्ष्याकडून जप्त केला आहे. त्यात सहा एलसीडी टीव्ही, लॅपटॉप, शिलाई मशीन, सीपीयू, कॅमेरा, ६० ग्रॅम सोन्याचाही समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक अमरसिंग जाधव, एलसीबीचे प्रमुख संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक सारंग मिराशी, सूरज बोंडे, संदीप चव्हाण, नितीन पतंगे, उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, भीमराव शिरसाठ, साहेबराव राठोड, मोहंमद शकील, विशाल भगत, सचिन हुमणे, हरीश राऊत, संदीप म्हेत्रे, नितीन खवडे, ममता देवतळे, सुरेंद्र वाकोडे यांनी ही कामगिरी केली.