दोन गटात तुफान हाणामारी; १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 05:47 PM2023-01-28T17:47:07+5:302023-01-28T17:47:26+5:30
जुन्या वादातून लाठ्या व काठ्या चालल्या
आर्णी (यवतमाळ) : एका महिलेला अपशब्द बोलल्याने तालुक्यातील देऊरवाडी (बुटले) येथे दोन गटात तुफान हाणामारी झाली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. पोलिसांनी दोन्ही गटातील १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
देऊरवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी ६:३०च्या सुमारास इंगळे व माघाडे या दोन गटात जुन्या वादातून लाठ्या व काठ्या चालल्या. यात माघाडे कुटुंबातील चार भावांनी शेजारी राहणाऱ्या इंगळे कुटुंबातील महिला, पुरुषांना घरात शिरून मारहाण केली. यात इंगळे कुटुंबातील बाबाराव माणिक इंगळे, शालिक गणपत इंगळे, कमला माणिक इंगळे, दत्ता माणिक इंगळे, संतोष शालिक इंगळे, अर्चना संतोष इंगळे, रामेश्वर शंकर शिंदे, गजानन सखाराम इंगळे हे आठजण जखमी झाले.
जखमींना गावकऱ्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. रात्री उशिरा याप्रकरणी हिंमत सखाराम इंगळे (३०) यांनी तक्रार दिली. त्यावरून गोपाल मोतीराम माघाडे (३१), संतोष मोतीराम माघाडे (२६), गणेश मोतीराम माघाडे (२५), राहुल मोतीराम माघाडे (३०) या चौघांविरुद्ध संगनमत करून घरात शिरून जीवे मारण्याच्या उद्देशाने महिला व पुरुषांना मारहाण केल्यावरून विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी आरोपी माघाडे यांनी वापरलेल्या दुचाकी घटनास्थळावरून रात्री ताब्यात घेतल्या आहेत. पुढील तपास उपनिरीक्षक किशोर खंडार करत आहेत.
दोन दिवसांपूर्वी झाला होता वाद
घटनेच्या दोन दिवसांपूर्वी बाबाराव इंगळे यांच्यासोबत गोपाल माघाडे याचा वाद झाला होता. बाबाराव यांची पत्नी सविता इंगळे यांच्याबद्दल गोपाल माघाडे याने अपशब्द वापरले होते. त्यावरून त्यादिवशी भांडणही झाले होते. दोघांनीही एकमेकांविरुद्ध पोलिसात तक्रारसुद्धा दिली होती. तेव्हापासूनच त्यांचे खटके उडत होते. यातूनच शुक्रवारी हाणामारी झाली.