नीटच्या परीक्षेत बसविले दोन बनावट विद्यार्थी, यवतमाळातील प्रकार

By अविनाश साबापुरे | Published: May 7, 2023 09:12 PM2023-05-07T21:12:56+5:302023-05-07T21:13:11+5:30

११ केंद्रांवर सुरळीत पार पडली परीक्षा

Two fake students appeared in the NEET exam, Yavatmal | नीटच्या परीक्षेत बसविले दोन बनावट विद्यार्थी, यवतमाळातील प्रकार

नीटच्या परीक्षेत बसविले दोन बनावट विद्यार्थी, यवतमाळातील प्रकार

googlenewsNext

यवतमाळ : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची ‘नीट’ परीक्षा रविवारी शहरात पार पडली. यावेळी एका परीक्षा केंद्रावर चक्क दोन बनावट परीक्षार्थी आढळले. याबाबत प्रशासनाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

नीट परीक्षेला गेल्या काही वर्षापासून वलय प्राप्त झाले आहे. त्यामुळेच ही परीक्षा देण्यासाठी लाखो रुपये खर्च करून खासगी क्लासेस लावले जात आहेत. आता तर चक्क नकली परीक्षार्थीच परीक्षा केंद्रावर पाठविण्याचा गंभीर प्रकार यवतमाळात पुढे आला आहे. त्यामुळे प्रशासनही हादरले आहे. 
दरम्यान शहरातील ११ केंद्रांवर ही परीक्षा सुरळीत पार पडली. जिल्ह्यातील ३ हजार ३६० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. रविवारी प्रत्यक्षात ३ हजार ३२० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ४० विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले.

परीक्षेचे शहर समन्वयक म्हणून प्राचार्य प्रफुल्ल चपाते यांनी काम सांभाळले. परीक्षेच्या आयोजनासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक डाॅ. पवन बन्सोड यांचे सहकार्य लाभल्याचे ते म्हणाले. ही परीक्षा यवतमाळातील जेडीआयईटी, ॲंग्लो हिंदी हायस्कूल, यवतमाळ पब्लीक स्कूल, सेंट अलाॅयसिअस, स्कूल ऑफ स्काॅलर्स, जायन्टस् स्कूल, जवाहरलाल दर्डा इंग्लीश मिडियम स्कूल, विद्या भवन काॅलेज ऑफ मॅनेजमेंट ॲंड रिसर्च, आबासाहेब पारवेकर काॅलेज, महर्षी विद्या मंदिर, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल या अकरा केंद्रांवर दुपारी २ ते ५ या वेळात घेण्यात आली.

दरम्यान, फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन विषयांनी विद्यार्थ्यांना प्रचंड घाम फोडला. क्लासमध्ये घेण्यात येणाऱ्या टेस्टपेक्षाही कठीण प्रश्न परीक्षेत होते. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तीन विषयांवर एकूण ७२० प्रश्न विचारण्यात आले. बायोलॉजीचे ३६० तर फिजिक्स व केमिस्ट्री या विषयावर आधारित प्रत्येकी १८० प्रश्न होते. या प्रश्नांची सोडवणूक करताना विद्यार्थ्यांची चांगलीच दमछाक झाली. तुलनेत बायोलॉजीचे प्रश्न तितके अवघड नव्हते, असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. प्रत्येक परीक्षा केंद्राबाहेर पालकांची गर्दी पाहायला मिळाली. एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएसएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांचे डाॅक्टर होण्याचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रस टेस्ट म्हणजेच ‘नीट’ परीक्षा देणे बंधनकारक आहे. 

मागील वर्षी ‘कॅफे’ चालकाने फसविले 
गेल्या वर्षी झालेल्या नीट परीक्षेत काही विद्यार्थिनींना एका सायबर कॅफे चालकाने फसविले होते. त्यांचा बनावट परीक्षा अर्ज कॅफे चालकाने भरला होता. विशेष म्हणजे या विद्यार्थिनींना त्याने बनावट हाॅल तिकिटही दिले. प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर मात्र या विद्यार्थिनींना परीक्षा न देताच परत जावे लागले.

Web Title: Two fake students appeared in the NEET exam, Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.