हापशीवर दोन तासानंतर दोन गुंड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 10:20 PM2018-05-09T22:20:39+5:302018-05-09T22:20:39+5:30

नळ येणे बंद झाले. नगरपरिषदेचे टँकरही वेळेवर येत नाही. हापशीवर जावे तर लांबच लांब रांग. दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर मिळते केवळ दोन गुंड पाणी. रात्रभर त्यासाठीही वाद-विवाद आणि भानगडी हे चित्र आहे, पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या यवतमाळ शहरातील मागासवस्त्यांचे.

Two holes of water after two hours at Hapshi | हापशीवर दोन तासानंतर दोन गुंड पाणी

हापशीवर दोन तासानंतर दोन गुंड पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देरात्रभर जागरण : झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल

ज्ञानेश्वर मुंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नळ येणे बंद झाले. नगरपरिषदेचे टँकरही वेळेवर येत नाही. हापशीवर जावे तर लांबच लांब रांग. दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर मिळते केवळ दोन गुंड पाणी. रात्रभर त्यासाठीही वाद-विवाद आणि भानगडी हे चित्र आहे, पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या यवतमाळ शहरातील मागासवस्त्यांचे. रात्रभर जागूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याने आता यवतमाळकरांच्या संयमाचा बांध फुटत आहे.
बेंबळाचे पाणी येणार, गोखीचे पाणी पोहोचणार अशा राजकीय वल्गनाही कोरड्या ठरल्या. शहरातील प्रत्येक भागात पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. मागासवस्त्यांमध्ये तर पाण्याशिवाय दुसरा कोणताच चर्चेचा विषय नाही. पाणी कसे मिळवायचे याचीच रात्रंदिवस चिंता असते. नगरपरिषदेचे टँकर वेळेवर येत नाही, आले तरी तोंड पाहून पाणी वाटतात. काही भागात तर आठ-आठ दिवस टँकरचे दर्शनही होत नाही. नळाची तर आशाच यवतमाळकरांनी सोडली आहे. अशा परिस्थितीत परिसरात असलेले हातपंप (हापशी) एकमेव आधार ठरत आहे. परंतु या ठिकाणीही रात्रंदिवस प्रचंड गर्दी असते. पाण्याचे भांडे ठेऊन दोन-दोन तास प्रतीक्षा करावी लागते. एकदाचा नंबर लागला की प्रचंड परिश्रमाने हापसून पाणी येते. दोन गुंड भरत नाही तोच दुसरा ओरडायला सुरुवात करतो आम्हालाही पाणी मिळू द्या, असे म्हणत आपला गुंड हापशी खाली लावतो. यातून अनेकदा भानगडी होतात. पाण्यावरून वाद होण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहे.
रोजमजुरी बुडवून अनेक जण सायकलला पिंप बांधून घरी पाणी आणत आहे. शुद्ध-अशुद्ध पाण्याचा विचार न करता पाणी मिळते ना यावरच समाधान मानावे लागत आहे. अशा भीषण परिस्थितीत आता नगरसेवकही वार्डात यायलाच काय फोनही उचलायला घाबरत आहे. नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत असल्याने त्यांचीही मोठी पंचाईत झाली आहे. पाणी आणायचे कोठून आणि वितरण करायचे कसे असा प्रश्न आहे. वस्तीत टँकर आला की पाण्यावरून वाद सुरू होतो. याचाही धसका अनेक टँकर चालकांनी घेतला आहे. काही भागात तर टँकर चालक जायलाही तयार नाही. नागरिकांच्या संयमाचा बांध फुटत असल्याने यवतमाळची ही पाणीटंचाई कोणत्या स्तराला जाईल, हे सांगता येत नाही.
पाण्याच्या शोधात डोळ्यात पाणी
नळाचे पाणी येण्याची कोणतीही शक्यता नाही. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने पाण्याचा शोध घेत आहे. दररोज पालिकेसह जिल्हा कचेरीवर मोर्चे धडकत आहे. परंतु आश्वासनापलीकडे काहीही होत नाही. आता यवतमाळात नळाला पाणीच नसल्यामुळे नागरिकांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ येऊन ठेपली आहे. निगरगट्ट यंत्रणा आजही गोखी-बेंबळाचे पाणी येणारच असे सांगत आहे. परंतु दिलेल्या तारखाही उलटत असल्याने त्यांच्या घशालाही आता कोरड पडली आहे. पाणी आणायचे कुठून हाच खरा प्रश्न आहे.

Web Title: Two holes of water after two hours at Hapshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.