प्रत्येक रविवार दोन तास निसर्गासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:40 AM2021-08-29T04:40:07+5:302021-08-29T04:40:07+5:30
पांढरकवडा : निसर्ग मित्रमंडळातर्फे मागील अनेक वर्षापासून ‘दर रविवारी दोन दोन तास निसर्गासाठी’ हा उपक्रम सुरू ...
पांढरकवडा : निसर्ग मित्रमंडळातर्फे मागील अनेक वर्षापासून ‘दर रविवारी दोन दोन तास निसर्गासाठी’ हा उपक्रम सुरू आहे.
या उपक्रमाअंतर्गत वनविभागाने लावलेल्या झाडांची काळजी घेणे, त्यांना पाणी देणे, निंदन-खुरपण करणे आदी कामे प्रत्येक रविवारी न चुकता केली जातात. आतापर्यंत १४० रविवार अखंडपणे हा उपक्रम श्रीकृष्ण टेकडी येथील वन उद्यानात सुरू आहे. वनविभाग आणि निसर्ग मित्रमंडळातर्फे लावण्यात आलेल्या या झाडांना पाणी देणे, त्याची साफसफाई करणे, फांद्यांची कटाई करणे या प्रकारचे कार्य केले जात आहे. त्याचप्रमाणे दर रविवारी वेगवेगळ्या प्रकारची झाडेसुध्दा लावली जातात. टेकडी परिसरात मागील काही आठवड्यात लावण्यात आलेल्या झाडांच्या मुळाजवळ मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत रविवारी साफ करण्यात आले. निसर्ग मित्रमंडळातर्फे दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी राख्या बांधून वृक्षसंवर्धन करण्याचे आवाहन करून वृक्षसंवर्धन केल्या जात आहे. मागील १० वर्षापासून हा उपक्रम अखंडपणे राबविला जात आहे. निसर्ग मित्रमंडळातर्फे आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची १४० फुलझाडे, फळझाडे, औषधी वनस्पती, धार्मिक महत्त्व असणारी झाडे आणि वेलवर्गीय तसेच वड, पिंपळ, कडुलिंब अशी मोठी वाढ होणारी झाडे लावण्यात आलेली आहेत. पर्यावरणाचे संतुलन राखणे आवश्यक असून त्यादृष्टीने निसर्ग मित्रमंडळाचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याची प्रतिक्रिया निसर्गप्रेमींकडून व्यक्त केल्या जात आहे. निसर्ग मित्रमंडळाचे अध्यक्ष सुबोध काळबांडे, स्वप्नील बोमेनवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले आहे.