पदयात्रेसाठीच्या भोजनातून दोनशे जणांना झाली विषबाधा, महानुभाव पंथीयांची पदयात्रा
By सुरेंद्र राऊत | Published: February 19, 2024 08:27 PM2024-02-19T20:27:52+5:302024-02-19T20:28:30+5:30
दारव्हा उपजिल्हा रुग्णालय व यवतमाळात उपचार
सुरेंद्र राऊत, यवतमाळ: माहूर येथून महानुभाव पंथीयांची पदयात्रा निघाली. ही पदयात्रा मजल दरमजल करीत मार्गक्रमण करीत होती. दारव्हा तालुक्यातील चिकणी कामठवाडा येथे सोमवारी ही पदयात्रा पोहोचली. येथे पदयात्रेतील भक्तांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. जेवण झाल्यानंतर काही वेळातच मळमळ व उटली हा त्रास सुरू झाला. काहींना लगतच्या गावातील खासगी डॉक्टरकडे नेण्यात आले. मोठ्या प्रमाणात ही लक्षणे दिसू लागल्याने रुग्णांना दारव्हा व यवतमाळ येथे हलविण्यात आले.
राजू घाटोळ यांच्या घरी चिकणी येथे पदयात्रेसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. माहूर येथून मोझर मार्गे ही पदयात्रा जांभोरा येथे जाणार होती. सोमवारी दुपारी जेवण केल्यानंतर अनेकांना मळमळ व उलटीचा त्रास होऊ लागला. ४० जणांना दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये नाशिक येथून पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांचा समावेश आहे. तर उर्वरित १८ जणांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींनी गावातच खासगी डॉक्टरांकडून उपचार घेतला आहे. जवळपास २०० जणांना जेवणानंतर ही लक्षणे आढळून आली. नेमक्या कुठल्या पदार्थातून विषबाधा झाली, याची तपासणी करण्यासाठी अन्नाचे नमुने सोबत आणले आहे. या घटनेने एकच खळबळ निर्माण झाली होती. दारव्हा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले.