मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांना अज्ञात वाहनाने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 10:27 AM2021-12-02T10:27:31+5:302021-12-02T15:32:40+5:30
मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन जणांना अज्ञात वाहनाने चिरडले. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ६ दरम्यान बाभुळगाव रोडवरील आष्टी फाट्याजवळ घडली.
यवतमाळ : मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन युवकांना चारचाकी वाहनाने चिरडले. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना कळंब-बाभूळगाव रोडवरील आष्टी फाट्याजवळ गुरुवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास घडली.
अमोल बबन गाडेकर (३८) व विवेक वासुदेव ठाकरे (३२) दोघेही रा. पिंपळगाव (होरे), अशी मृतांची नावे आहेत. अमोल गाडेकर, विवेक ठाकरे व पंकज उईके असे तिघे मित्र नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाभूळगाव रोडने निघाले होते. मॉर्निंग वॉक झाल्यानंतर आष्टी फाट्याजवळ तिघेही मित्र व्यायाम करीत होते. दरम्यान, पंकज उईके हा काही अंतरावर शौचास गेला. त्याचवेळी कळंबवरून बाभूळगावकडे जाणाऱ्या चारचाकी अज्ञात वाहनाने रस्त्याच्या कडेला व्यायाम करणाऱ्या अमोल गाडेकर व विवेक ठाकरे यांना चिरडले.
यात दोघांचाही जागील मृत्यू झाला. पंकज उईके काही क्षणापूर्वीच अपघाताच्या ठिकाणावरून दूर गेला होता. त्याचे दैव्य बलत्तर म्हणून तो बचावला. अज्ञात वाहन हे आयशर कंपनीचे होते, अशी माहिती आहे. हे वाहन नेहमी या रस्त्याने संत्रा व शेतमालाची वाहतूक करते, असे सांगण्यात आले. अज्ञात वाहनाच्या चालकावर पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
मृत विवेक ठाकरे हे माजी उपसरपंच होते. गावात त्यांना मानणारा मोठा वर्ग होता. कुणाच्याही अडचणीला धाऊन जाण्याची त्यांची वृत्ती होती. त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. अमोल गाडेकर हे कळंब येथे मोटारसायकल दुरुस्तीचे काम करायचे. धोरणी युवक म्हणून त्यांची ओळख होती; परंतु एका क्षणात दोघांनाही नियतीने हिरावून नेले. त्यामुळे पिंपळगाववर शोककळा पसरली आहे.