जिल्ह्यात वीज कोसळून दोन ठार
By admin | Published: September 15, 2016 01:19 AM2016-09-15T01:19:23+5:302016-09-15T01:19:23+5:30
जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोन जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले.
चार गंभीर : उमरखेड, घाटंजी, महागाव तालुक्यातील घटना
यवतमाळ : जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोन जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. तसेच दोन बैलही ठार झाले. या घटना बुधवारी उमरखेड तालुक्यातील अंबाळी, घाटंजी तालुक्यातील मानोली आणि महागाव तालुक्यातील मुडाणा येथे घडल्या.
उमरखेड तालुक्यातील अंबाडी शिवारात वीज पडून शेतकरी नाना मारोती बळी (५५) ठार झाले. तर आशा नाना बळी (१६), किसन कान्होजी बोंबले (५०) हे गंभीर जखमी झाले. तसेच एक बैल मृत्युमुखी पडला. बळी यांचे कुटुंब शेतातच राहतात. बुधवारी दुपारी जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे त्या सर्वांनी राहत्या झोपडीचा आधार घेतला. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वीज झोपडीवर कोसळली. त्यात नाना जागीच ठार झाला तर मुलगी आशा आणि किसन गंभीर जखमी झाले. त्यांंना उमरखेडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दुसरी घटना घाटंजी तालुक्यातील मानोली येथे घडली. पांडुरंग दौलत शेंडे (३०) हा वीज कोसळून ठार झाला, तर गोविंदा दौलत शेंडे (२८) हा जखमी झाला. बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. शेतात फवारणी सुरू असताना वीज कोसळली. पांडुरंग, गोविंदा आणि त्यांचे वडील दौलत हे तिघे शेतात होते. दोघे भाऊ एकाच ठिकाणी, तर वडील दौलत हे दुसऱ्या ठिकाणी होते. जखमी गोविंदा याला उपचारासाठी संजय शेंडे, पुरुषोत्तम शेंडे, मोवाडाचे उपसरपंच जयवंत आडे आदींनी यवतमाळ येथे रुग्णालयात हलविले. तिसरी घटना महागाव तालुक्यातील मुडाणा येथे घडली. या घटनेत वसंत बाबाराव घुमनर यांच्या मालकीचा बैल वीज कोसळल्याने ठार झाला. तर दुसरा बैल गंभीर जखमी झाला. (लोकमत चमू)