सोनापूर नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या दोघांचाही मृत्यू, सोमवारी रात्री घडली दुर्घटना : गावकरी व बचाव पथकाने केले शोधकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:31 AM2021-09-02T05:31:33+5:302021-09-02T05:31:33+5:30
सतीश मधुकर देठे (४१), राजेंद्र नामदेव उईके (३७) अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी वणी तालुक्यात ...
सतीश मधुकर देठे (४१), राजेंद्र नामदेव उईके (३७) अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी वणी तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोनापूर या गावालगत राजूर कॉलरी ते भांदेवाडा मार्गावर असलेल्या नाल्याला मोठा पूर आला होता. सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास नाल्याला पूर आला असताना सोनापूर गावातील काही लोक नाल्याच्या पलीकडे अडकून पडले होते. याबाबतची माहिती सतीशला मिळाली. सतीशने राजेंद्रला सोबत घेऊन दुचाकीने नाला गाठला. नाल्याच्या काठावर दुचाकी ठेवून नाल्याच्या पलीकडे अडकून पडलेल्या लोकांना गावाकडील तीरावर घेऊन येण्यासाठी दोघेही नाल्यात उतरले. नाल्यातील पुराचा प्रवाह वेगाने वाहत असल्याने व त्याचा अंदाज दोघांनाही न आल्याने दोघेही पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत गेले. ही बाब नाल्याच्या पैलतीरावर अडकून असलेल्या लोकांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच या दुर्घटनेबाबत गावात माहिती दिली. माहिती मिळताच गावकऱ्यांनी नाल्याकडे धाव घेतली. अंधारात दोघांचाही शोध घेणे सुरूच होते. गावकरी व कुटुंबातील व्यक्तींनी रात्रभर शोधमोहीम सुरू ठेवली. यादरम्यान, मंगळवारी सकाळी ३ ते ४ वाजताच्या सुमारास नीळकंठ देठे यांच्या शेताजवळ नाल्याच्या प्रवाहात सतीश मधुकर देठे याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मंगळवारी सकाळपासून पुन्हा गावकऱ्यांनी शोधमोहीम हाती घेतली. दुपारी यवतमाळ येथील बचाव पथकही सोनापुरात दाखल झाले. वणीचे तहसीलदार श्याम धनमने, वणीचे ठाणेदार वैभव जाधव, निवासी नायब तहसीलदार विवेक पांडे हेदेखील घटनास्थळी पोहोचले. शोधकार्य सुरू असताना मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास राजेंद्र नामदेव उईके याचा मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागला.
बॉक्स- पूल बांधण्याकडे दुर्लक्ष
मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत नांदेपेरा-सोनापूर-राजूर कॉलरी या जोड रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले. ज्या नाल्यात दोघे वाहून गेले, तो नाला या मार्गावरच आहे. यावर पूल तयार करणे गरजेचे असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.