पाटाळा येथे वर्धा नदीत वाहन कोसळून दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 11:36 PM2018-02-20T23:36:35+5:302018-02-20T23:36:59+5:30
पाण्याचे पाऊच घेऊन वणीकडे येणारा टाटा एस (छोटा हाथी) वाहन पाटाळा पुलावरून वर्धा नदीत कोसळल्याने चालकासह दोन जण जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : पाण्याचे पाऊच घेऊन वणीकडे येणारा टाटा एस (छोटा हाथी) वाहन पाटाळा पुलावरून वर्धा नदीत कोसळल्याने चालकासह दोन जण जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास घडली.
मक्की नासीर चिनी (१९) व चालक संजय लोणारे (२६) दोघेही राहणार वणी अशी मृतांची नावे आहेत. येथील रमीजराजा अख्तर चिनी याचा कोल्ड्रींक्स व मिनरल वॉटर विकण्याचा व्यवसाय आहे. सोमवारी १९ फेब्रुवारीला रमीजराजा, त्याचा भाऊ मक्की नासीर चिनी व चालक संजय लोणारे हे तिघेजण टाटा एस (क्र.एम.एच.२९-ए.टी.०२०५) या वाहनाने पाणी पाऊच आणण्यासाठी वर्धा येथे गेले होते. वाहनात पाणी पाऊच भरून वणीकडे येत होते. मंगळवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास पाटाळा पुलावर चालक लोणारे याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट नदीत कोसळले. रमीजराजा ट्रॉलीत बसून असल्याने तो नदीच्या प्रवाहात फेकल्या गेला, तर मक्की नासीर चिनी व संजय लोणारे हे दोघे केबिनमध्ये असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. परिणामी त्यांचा जागीच मृत्यू झाला. रमीजराजा हा गंभीर जखमी झाला.
घटनेची महिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन गावकºयांच्या मदतीने रमीजराजाला बाहेर काढले. याप्रकरणी वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
‘तो’ पूल धोकादायक
वणी-वरोरा मार्गावरील वर्धा नदीवरील पाटाळा पूल अपघात प्रवणस्थळ म्हणूनच ओळखले जाते. आतापर्यंत या पुलावर अनेक अपघात झाले आहे. परंतु बांधकाम विभागाकडून अपघात होऊ नये म्हणून कोणतीही उपाययोजना केली नाही. परिणामी पुन्हा दोन तरुणांना जीव गमवावा लागला.