दोन लाख कृषीपंपाच्या वीज जोडण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 11:30 AM2019-06-04T11:30:46+5:302019-06-04T11:34:10+5:30

पंतप्रधानांनी कृषी उत्पादन दुप्पट करण्यावर भर दिला आहे. नवीन सरकारमध्येही या धोरणाची अंमलबजावणी होणार असल्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्याकरिता प्रकल्प आणि विहिरींच्या माध्यमातून ओलित करण्यात येणार आहे.

Two lakhs of agricultural electricity connections are pending | दोन लाख कृषीपंपाच्या वीज जोडण्या खोळंबल्या

दोन लाख कृषीपंपाच्या वीज जोडण्या खोळंबल्या

Next
ठळक मुद्देट्रान्सफार्मर मिळेनाअतिउच्च दाब वाहिनीचा प्रयोग प्रभावीत

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पंतप्रधानांनी कृषी उत्पादन दुप्पट करण्यावर भर दिला आहे. नवीन सरकारमध्येही या धोरणाची अंमलबजावणी होणार असल्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्याकरिता प्रकल्प आणि विहिरींच्या माध्यमातून ओलित करण्यात येणार आहे. यामुळेच सिंचनासाठी लागणाऱ्या कृषीपंपांना तत्काळ वीज जोडण्या देण्याचे आदेश उर्जामंत्र्यांनी दिले आहे. तरी अद्यापही एक लाख ९३ हजार कृषीपंपांना वीज जोडण्या मिळाल्या नाही. ट्रान्सफार्मरच्या पुरवठ्याविना या जोडण्या खोळंबल्या आहेत.
अतिउच्च दाब वाहिन्यांवरून शेतकऱ्यांना थेट विजेचे कनेक्शन देण्याचा निर्णय वीज वितरण कंपनीने घेतला आहे. राज्य शासनाच्या मदतीने महावितरण कंपनी एचव्हीडीएस योजना राबवित आहे. पाच हजार ४८ कोटी रूपयांची ही योजना आहे. यामुळे प्रत्येक शेतकºयासाठी स्वतंत्र डीपी कृषी फिडरच्या क्षेत्रात पाहायला मिळणार आहे. त्या दृष्टीने अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
विदर्भात ५० हजार वीज जोडण्यांचे अर्ज वीज वितरण कंपनीकडे दाखल करण्यात आले आहे. राज्यात कृषीपंपांकरिता दोन लाख १८ हजार शेतकºयांचे अर्ज आले आहेत. या शेतकऱ्यांना वीज जोडणी करण्यासाठी ट्रान्सफार्मर पुरविले जात आहे. मात्र याची संख्या फार कमी आहे. ट्रान्सफार्मर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे उत्पादन मागणीच्या तुलनेत कमी पडले आहे. यामुळे कृषीपंपांचे वीज कनेक्शन थांबले आहेत. लवकरच ट्रान्सफार्मरचा पुरवठा होईल, असे कंपनीच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
राज्यभरात कृषी ट्रान्सफार्मरचा पुरवठा करण्याचे काम प्रमुख कंपन्यांकडे देण्यात आले आहे. या कंपन्यांनी आतापर्यंत राज्यभरात २५ हजार ट्रान्सफार्मर पुरविले आहेत. येणाऱ्या काळात हे ट्रान्सफार्मर आणखी वाढणार आहेत. तोपर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

यवतमाळकडे केवळ ६५० ट्रान्सफार्मर
यवतमाळ जिल्ह्यात आठ हजार शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या जोडणीसाठी अर्ज केले आहे. प्रत्यक्षात ६५० ट्रान्सफार्मर या ठिकाणी पोहोचले आहेत. पुरवठ्यानुसार वीज जोडण्या करण्यात येत आहे. यानंतरही अनेक शेतकरी जोडणीपासून वंचित आहेत.

सौरपंपात विविध अडचणी
वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना सौरपंपाचा प्रस्ताव ठेवला आहे. सोलरपंपामध्ये खोली आणि पाणी ओढताना विविध अडचणी निर्माण होतात. सोलरपंप सुरक्षा आणि त्याच्या दुरूस्तीसाठीही मोठे प्रश्न निर्माण होतील. शिवाय वर्षभरानंतर त्याची कार्यक्षमता कमी होईल. यामुळे विदर्भातील बहुतांश शेतकऱ्यांनी सोलरपंपाच्या मागणीकडे पाठ फिरविल्याचेच चित्र आहे.

ऑनलाईन अर्ज थांबण्याचे कारण गुलदस्त्यात
जुन्याच वीज जोडण्या प्रलंबित आहेत. यामध्ये नवीन वीज जोडण्यांची भर पडली, तर आकडा मोठा होण्याचा धोका आहे. यामुळे वीज कंपनीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज डाऊनलोडच होत नाही. याबाबत अधिकृतरीत्या कोणीही बोलायला तयार नाही.

एचव्हीडीएस योजनेतून दोन लाख १८ हजार अर्ज आले आहेत. यापैकी २५ हजार ट्रान्सफार्मर राज्यात पुरविण्यात आले आहे. यावरून कृषीपंपांच्या २५ हजार जोडण्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
- विश्वास पाठक
संचालक, होल्डींग कंपनी, वीज वितरण

Web Title: Two lakhs of agricultural electricity connections are pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती