दोन भूमाफिया फिरताहेत मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 09:49 PM2018-07-12T21:49:03+5:302018-07-12T21:49:38+5:30

बँकेकडे तारण असतानाही दोन दुकान गाळ्यांची विक्री करून येथील दूध विक्रेत्याची फसवणूक करणारे दोन भूमाफिया पोलिसांच्या आशीर्वादाने सुमारे दीड वर्षांपासून मोकाट फिरत आहेत.

Two landmines roam around | दोन भूमाफिया फिरताहेत मोकाट

दोन भूमाफिया फिरताहेत मोकाट

Next
ठळक मुद्देपोलिसांचा आशीर्वाद : राजकीय वरदहस्त, अटकपूर्व जामीन नाकारला, बँका-महसूलच्या यंत्रणेची मिलीभगत

राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बँकेकडे तारण असतानाही दोन दुकान गाळ्यांची विक्री करून येथील दूध विक्रेत्याची फसवणूक करणारे दोन भूमाफिया पोलिसांच्या आशीर्वादाने सुमारे दीड वर्षांपासून मोकाट फिरत आहेत. राजकीय आशीर्वादामुळे पोलीस पाठीशी असल्याने या माफियांनी असे अनेकांना फसवणुकीचे शिकार बनविले आहे.
राकेश व मंगेश अशी या भूमाफियांची नावे आहेत. येथील नामांकित दूध विक्रेत्याच्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात त्या दोघांविरुद्ध भादंवि ४२०, ४०६, ३४ कलमान्वये २०१६ मध्येच गुन्हा नोंदविला गेला. दूध विक्रेत्याने ठिकठिकाणी तक्रारी दिल्या. मात्र राजकीय अभय असल्याने पोलिसांनी सुरुवातीला या भूमाफियांविरोधात तक्रारी घेणेच टाळले. एका बड्या शिवसेना नेत्याने फोन केल्यानंतर तत्कालीन एसडीपीओंनी तक्रार घेऊन गुन्हा नोंदविला. दरम्यान त्या पोलीस अधिकाऱ्याची बदली झाली. तर दुसरीकडे आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी धडपड केली. परंतु फसवणुकीचे हे प्रकरण गंभीर असल्याचे नमूद करीत न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. मात्र त्यानंतरही पोलिसांनी त्यांना अटक केली नाही.
सदर दूध विक्रेत्याचे प्रकरण असे की, मंगेश नामक भूमाफियाने फेसबुकद्वारे या दूध विक्रेत्याशी मैत्री केली. त्यानंतर महागड्या वाहनांमधून येऊन व बड्या राजकीय नेत्यांशी संपर्क सांगून दूध विक्रेत्याच्या भेटी घेतल्या. लाखो-कोटींच्या बाता करणाºया या मंगेशच्या जाळ्यात अल्पावधीतच दूध विक्रेता अडकला. मंगेशने संदीप टॉकीज परिसरातील दुकान गाळे दाखविले. पाच पैकी दोन दुकाने तातडीने विकायची असल्याचे सांगितले. ही संपत्ती राकेशची असल्याचे सांगितले गेले. राकेश स्वत:ही त्यावेळी उपस्थित होता. कराराची प्रतही दाखविली गेली. तीन लाख पाच हजार रुपयात एक दुकान या भावाने दोन दुकाने दूध विक्रेत्याने खरेदी केली. प्रत्यक्षात त्याचा बाजारभाव तीनपट अधिक असल्याचे सांगितले जाते. दुय्यम निबंधक कार्यालयात सतत अधिकारी-कर्मचाºयांशी सलगी ठेवणाºया प्रकाशने कागदपत्रांची हेराफेरी करताना या व्यवहारात महत्वाची भूमिका बजावली. अधिकाºयाच्या कन्सेन्टने किंवा त्यांना अंधारात ठेऊन हा व्यवहार नोंदविला गेला.
फेरफारची जबाबदारीही मंगेश व राकेशनेच घेतली होती. सात ते आठ महिने लोटूनही फेरफार होऊ दिला जात नसल्याचे लक्षात आल्याने सदर दूध विक्रेत्याने स्वत: भूमी अभिलेख कार्यालय गाठले असता या दुकान गाळ्यांवर यवतमाळातील एका बँकेचे ५० लाख रुपयांचे कर्ज असल्याची खळबळजनक बाब पुढे आली. विशेष असे सदर बँकेतील लिपिकवर्गीय यंत्रणा व महसूल विभागातील बाबूंच्या संगनमताने हे कर्ज सातबारावर चढविले गेले नाही. मंगेश व राकेशने या दुकानांवर पाच लाखांचे कर्ज होते, ते निल केल्याचा दाखला दूध विक्रेत्याला दाखविला होता. मात्र प्रत्यक्षात पाच लाख परतफेड केल्यानंतर पुन्हा ५० लाख कर्ज उचलले गेले. त्याबाबत दूध विक्रेत्याला अंधारात ठेवण्यात आले.
पोलिसांकडे बिनधास्त तक्रारी करा
स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्रीत कुणाचीही फसवणूक झाली असेल तर त्यांनी कोणतीही भीती न बाळगता थेट पोलिसांकडे अगदी निर्धास्त होऊन तक्रारी कराव्या, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी गुरुवारी पत्रपरिषदेतून केले.
माफिया मंगेश काँग्रेसचा पदाधिकारी
भूमाफिया म्हणून ओळखला जाणारा मंगेश हा काँग्रेसचा पदाधिकारी असल्याचे सांगितले जाते. घटनात्मक पदाच्या आडोश्याने आतापर्यंत त्याने स्वत:चा बचाव केला. शिवाय सत्ताधारी पक्षासोबत थेट मुंबईपर्यंत आपले कॉन्टॅक्ट असल्याने पोलीस आपले काहीच बिघडवू शकत नाही, अशा डरकाळ्या तो व्यापाऱ्यांपुढे फोडतो.
सहा लाखांच्या संपत्तीवर ५० लाखांचे कर्ज !
सहा लाख रुपयांची मूळ किंमत असलेल्या दोन दुकान गाळ्यांच्या तारणावर यवतमाळातील शहरी बँकेने तब्बल ५० लाख रुपयांचे कर्ज मंजूर केलेच कसे हा संशोधनाचा विषय आहे. या दुकान गाळ्यांची बाजारभावाने किंमत लावली तरी कर्जाच्या अर्धीही होत नाही. यावरून या कर्जप्रकरणात बँकेतील यंत्रणा गुंतलेली असल्याचे स्पष्ट होते. याच नव्हे तर अशा आणखी काही बँकांची अनेक बोगस कर्ज प्रकरणे यानिमित्ताने पुढे आली आहेत.

Web Title: Two landmines roam around

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.