फिरायला गेलेल्या युवकांना भरधाव वाहनाने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 03:39 PM2022-01-07T15:39:46+5:302022-01-07T15:53:53+5:30
दोघेही गुरुवारी रात्री फिरून आल्यानंतर रस्त्यावरील दुभाजकावर गोष्टी सांगत बसले होते. त्यावेळी सुसाट वेगात आलेले वाहन त्या दुभाजकावर धडकले. त्यात या दोन्ही युवकांचा मृत्यू झाला.
राळेगाव (यवतमाळ) : रात्रीचे जेवण आटोपून फिरायला गेलेल्या दोन युवकांंना भरधाव वाहनाने चिरडले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री १० वाजता येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ वर घडली.
प्रवीण श्रीराम बनसोड (४०) आणि दिनेश जयराम निकोडे (४२) दोघेही रा.इंदिरानगर राळेगाव अशी मृतांची नावे आहे. हे दोघेही गुरुवारी रात्री फिरून आल्यानंतर रस्त्यावरील दुभाजकावर गोष्टी सांगत बसले होते. त्यावेळी सुसाट वेगात आलेले वाहन (एमएच-३४-एए-७८४८) त्या दुभाजकावर धडकले. त्यात या दोन्ही युवकांचा मृत्यू झाला.
घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. पोलीसही पोहोचले. वाहन चालक कुणाल देवराव नाखले याला ताब्यात घेण्यात आले. हा चालक दारू पिऊन असल्याचे आढळले. प्रवीण बनसोड व दिनेश निकोडे हे दोघेही मित्र सुस्वभावी होते. ते रोज रात्री नित्य नेमाणे फिरायला जात होते. मात्र, गुरुवारी ते बराच उशीर होऊनही परत न आल्याने कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रवीण बनसोडे हा झेरॉक्स सेंटर चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. कर्ता मुलगा गेल्याने त्याची आई सुशीला, भाऊ योगेश, पत्नी प्रीती, मुली स्पर्शिका व प्रियांशी हे कुटुंब उघड्यावर आले आहे, तर दिनेश निकोडे याच्यामागे पत्नी वनिता, मुलगा किरण, तुषार असा संसार आहे.
महामार्ग ठरला मृत्यूचा सापळा
शहरातून जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग सतत अपघातांना निमंत्रण देणारा सापळा ठरत आहे. यापूर्वीही येथे अनेक मृत्यू झाले. चारपदरी रोड असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याचे रुंदीकरण होऊ दिले नाही, असा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. दरम्यान, व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून या प्रकाराचा निषेध नोंदविला. सहायक पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांनी वाहन चालक कुणाल नाखले याच्यावर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.