स्थानिक गुन्हे शाखेला अखेर दोन पोलीस निरीक्षक
By admin | Published: July 5, 2014 01:36 AM2014-07-05T01:36:33+5:302014-07-05T01:36:33+5:30
‘मिनी-एसपी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस प्रमुख पदाच्या रस्सीखेचमध्ये ...
यवतमाळ : ‘मिनी-एसपी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस प्रमुख पदाच्या रस्सीखेचमध्ये अखेर संजय पुज्जलवार यांनी बाजी मारली. तर त्यांचा ‘पाठलाग’ करणाऱ्या शिवाजी बचाटे यांना तेथेच ‘सेकंड’मध्ये नेमणूक देण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेत निरीक्षकांची दोन पदे मंजूर आहे. परंतु गेली अनेक वर्षे एकाच निरीक्षकावर कारभार चालविला गेला. त्यांच्या दिमतीला एपीआय-पीएसआय दिले गेले. अलिकडेच प्रल्हाद गिरी यांना प्रमुख बनवून त्यांच्या अधिनस्त एका वरिष्ठ निरीक्षकाला देण्यात आले होते. मात्र ते रुजू झाले नाही. दरम्यान गिरी यांची बदली झाल्याने पोलीस निरीक्षकाची जागा रिक्त होती. या जागेसाठी अनेक पोलीस निरीक्षकांनी राजकीय मार्गाने फिल्डींग लावली होती. संजय पुज्जलवार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या चॅनलने गृहमंत्रालयातून तर शिवाजी बचाटे यांनी काँग्रेसच्या चॅनलने मुंबईच्या टिळक भवनातून फिल्डींग लावली. दोनहीकडून अमरावतीमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर राजकीय दबाव वाढविला गेला. या वाढत्या दबावामुळेच अखेर महानिरीक्षकांनी संतप्त होऊन या अधिकाऱ्यांना धडा शिकविण्याची तयारीही केली होती, असे सांगितले जाते. दरम्यान महानिरीक्षक रजेवर गेले. त्यानंतरही या पोलीस निरीक्षकांसाठीचा मुंबईतून असलेला राजकीय दबाव कायम होता. अखेर गुरुवारी जिल्ह्यातील काही ठाणेदारांची फेरबदल करण्यात आली. त्यात संजय पुज्जलवार यांची सरशी झाली. त्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख बनविण्यात आले. तर घाटंजी येथे ठाणेदार असलेल्या शिवाजी बचाटे यांना एलसीबीत पुज्जलवार यांच्या अधिनस्त नेमणूक देण्यात आली. ते पाहता एलसीबीच्या शर्यतीत राष्ट्रवादीची सरशी झाली तर काँग्रेस दुसऱ्या स्थानावर राहिली, अशा प्रतिक्रिया पोलीस वर्तुळातूनच ऐकायला मिळत आहे. पुज्जलवार हे महागाव येथे ठाणेदार होते. त्यांच्या जागी आता विशेष शाखेतून निरीक्षक आगे यांना पाठविण्यात आले. विशेष शाखेत शेळके यांची नेमणूक करण्यात आली. घाटंजी येथे पोलीस निरीक्षक कांबळे तर पुसदच्या वाहतूक शाखेचे प्रमुख म्हणून निरीक्षक जगदाळे यांना पाठविण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)
६० पोलिसांच्या फौजेला अखेर सेनापती मिळाले, आता आव्हान ‘डिटेक्शन’चे
स्थानिक गुन्हे शाखेकडे सुमारे ६० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची फौज आहे. तेथे सेनापतींचीच कमतरता होती. प्रशासनाने एक नव्हे तर तब्बल दोन ‘सशक्त’ सेनापती एलसीबीला दिले आहेत. याशिवाय आर्थिक गुन्हे शाखेला स्वतंत्र निरीक्षक, अन्य दोन सहायक निरीक्षक, चार फौजदार आणि भला मोठा कर्मचारी वर्ग एलसीबीत तैनात आहेत. आतापर्यंतची गेल्या काही महिन्यातील एलसीबीची कामगिरी झिरो ठरल्याचे चित्र आहे. चार ते पाच डझन कर्मचारी घेऊन फिरणाऱ्या एलसीबीत अलिकडे डिटेक्शनचे आव्हान आहे. सर्रास चोऱ्या, घरफोड्या होत आहेत. मात्र चोरट्यांची एकही टोळी पोलिसांच्या हाती लागली नाही. शरीरासंबंधीच्या गुन्ह्यात संघटित टोळ्यांचे म्होरके सापडत नाहीत. या सततच्या अपयशामुळे पोलीस अधीक्षक व महानिरीक्षकांनी यंत्रणेची चांगलीच झाडाझडती घेतली. गुन्हेगारी वर्तुळात ‘लिंक’ उघड झाल्याने निलंबनाची कारवाईही करण्यात आली. विशेष असे याच एलसीबीने काही महिन्यांपूर्वी धुमधडाक्यात डिटेक्शन केले आहे. परंतु गेल्या काही महिन्यातील ‘कामगिरी’ पाहता एलसीबीने शस्त्रे खाली ठेवली की काय असा संशय येऊ लागला आहे. पुज्जलवार व बचाटे हे दोन निरीक्षक रुजू झाल्याने एलसीबीची शक्ती आणखी वाढली आहे. त्यांची संयुक्त ताकद दिसते की गटबाजी व एकमेकांवर पाळत ठेवण्यातच ‘एनर्जी’ जाते, याकडे पोलीस वर्तुळाचे लक्ष लागले आहे.