यवतमाळ जिल्ह्यात परदेशातून दोघे परतले; कोरोनाचे अहवाल मात्र निगेटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 08:55 PM2020-12-24T20:55:31+5:302020-12-24T20:55:41+5:30
जिल्ह्यातील पुसद तालुक्यात परदेशातून दोन नागरिक परत आले. यापैकी ८ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेतून २५ वर्षीय युवक नागपूर विमानतळावर उतरला.
यवतमाळ जिल्ह्यात परदेशातून दोघे परतले
यवतमाळ : ब्रिटनमध्ये नव्या स्वरूपाच्या कोरानाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासन सतर्क झाले असून परदेशातून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे. जिल्ह्यातही नुकतेच दोन नागरिक परदेशातून परतले. मात्र त्यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगितले जाते.
जिल्ह्यातील पुसद तालुक्यात परदेशातून दोन नागरिक परत आले. यापैकी ८ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेतून २५ वर्षीय युवक नागपूर विमानतळावर उतरला. त्यानंतर १८ डिसेंबरला एक २५ वर्षीय युवक अमेरिकेतून नागपूर विमानतळावर उतरला. हे दोघेही दिल्लीवरून विमानाने नागपूरला आल्याचे पुसदच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. या दोघांचीही नागपूर विमानतळावर रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या दोघांचीही गुरुवारी पुसद येथे पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल अद्याप बाकी आहे. याशिवाय जिल्ह्यात बाहेर देशातून कुणीही परतले नसल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.