यवतमाळात दोघांची चाकूने भोसकून हत्या; पांढरी घाटात थरार
By सुरेंद्र राऊत | Published: May 2, 2023 01:05 PM2023-05-02T13:05:56+5:302023-05-02T13:06:11+5:30
रूईवाई येथे १०० रुपयांपासून युवकाचा खून
यवतमाळ : सोमवारी रात्री ११ वाजता पोलिसांना पांढरी घाटात भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. घटनास्थळावर पोलिस पोहोचल्यानंतर तेथील दृष्य वेगळेच होते. अज्ञात मारेकऱ्यांनी दोन युवकांना निर्दयीपणे चाकू व लोखंडी रॉडने वार करून जागेवरच ठार केले. दोघांचा एकाच वेळी खून हे दृष्य पाहताच पोलिसांनाही धक्का बसला. तत्काळ पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड घटनास्थळी पोहोचले. आरोपी अजूनही अज्ञात आहे. या पाठोपाठच यवतमाळ तालुक्यातील रूईवाई येथे २९ एप्रिल रोजी चाकूहल्ल्यातील जखमी युवकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ग्रामीण पाेलिस करीत असतानाच दोघांच्या हत्येचा पंचनामा करण्याची वेळ आली.
अविनाश हनुमंत कटरे (३२) रा. पाटापांगरा ता. घाटंजी ह.मु. चापडोह यवतमाळ, उज्वल उर्फ गोलू नारायण छापेकर (२८) रा. डेहणकर ले-आऊट अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही अविनाशच्या पाटापांगरा या गावावरून दुचाकीने यवतमाळकडे येत होते. त्यांना मारेकऱ्यांनी पांढरी घाटात अडवून सोमवारी रात्री त्यांच्यावर चाकू व लोखंडी रॉडने प्रहार केले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शवचिकित्सागृहात आणले. या प्रकरणी उज्वल छापेकर याचे जावई विकास हंसकर (३६) रा. महसूलनगर वाघापूर यांच्या तक्रारीवरून यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध दोघांची हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
रुईवाई येथे १०० रुपयांसाठी नौशाद शहेनशाह (३५) याला चाकूने भोसकण्यात आले. गावातीलच शेख तालीब शेख वहाब कुरेशी (२७) याने हा हल्ला केला. जखमी नौशादचा ३० एप्रिलच्या रात्री रुग्णालयात मृत्यू झाला. त्याचा डेथ मेमो सोमवारी ग्रामीण पोलिस ठाण्यात पोहोचला. तेथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. हा गुन्हा हातावेगळा होत नाही तोच घाटंजी मार्गावरील पांढरी घाटात दोघांची हत्या झाल्याची माहिती धडकली.