‘जेडीआयईटी’चे दोन विद्यार्थी सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 09:46 PM2018-10-29T21:46:19+5:302018-10-29T21:46:48+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना आयईटीईचा इनोव्हेशन मीट पुरस्कार प्राप्त झाला आहे. यात संगणक अभियांत्रिकी विभागाची दिव्या सोढा व परमाणु व दूरसंचार विभागाचा प्रसाद नीलजकर यांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना आयईटीईचा इनोव्हेशन मीट पुरस्कार प्राप्त झाला आहे. यात संगणक अभियांत्रिकी विभागाची दिव्या सोढा व परमाणु व दूरसंचार विभागाचा प्रसाद नीलजकर यांचा समावेश आहे.
आयईटीईद्वारा नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पातळीवरील इनोव्हेशन अँड इंडस्ट्री मीट-२०१८ या सोहळ्यात सदर विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण प्रकल्पाच्या कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. संपूर्ण भारतातील आयईटीईच्या चार विभागातील राज्यांमध्ये पार पडलेल्या झोनल इनोव्हेशन मीटमधून निवडलेल्या प्रकल्पाचे सादरीकरण या सोहळ्यात करण्यात आले. दिव्या सोढा हिला ‘आॅटोमॅटिक इंस्ट्रुमेंट सिस्टीम टू रेकॉर्ड अँड आयडेंटीफाय नॉक्टरनल बर्ड कॉल्स विथ व्हेरिअज वेदर पॅरामिटर्स’ या नावीण्यपूर्ण प्रकल्पासाठी द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रसाद नीलजकर याला ‘आॅटोमेटेड बस स्टेशन मॉनिटरिंग सिस्टम’ या कौशल्यपूर्ण प्रकल्पासाठी तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आयईटीई नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. के.टी.व्ही. रेड्डी, भारत सरकारच्या भूविज्ञान विभागाचे सचिव माधवन नायर राजीवन, सी-डॉटचे कार्यकारी संचालक विपीन त्यागी आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशाचे जवाहरलाल दर्डा एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, जेडीआयईटीचे प्राचार्य डॉ. रामचंद्र तत्त्ववादी, आयईटीई यवतमाळ उपकेंद्राचे अध्यक्ष डॉ. संजय गुल्हाने, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. दिनेश चौधरी आदींनी कौतुक केले.