जिल्हा परिषदेच्या एकाच रस्त्यावर दोन निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 05:00 AM2020-11-06T05:00:00+5:302020-11-06T05:00:04+5:30

खरुस ते उंचवडद असा हा रस्ता असून दोन ते तीन किलोमीटर या लांबीत हे काम केले जाणार आहे. २० लाखांची निविदा रस्ता सुधारणेची तर आठ लाखांची निविदा पॅचेसची आहे. पीयूष नामक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याला ही कामे देण्याचा घाट आहे. वास्तविक हा कंत्राटदार ‘सुशिक्षित बेरोजगार अभियंता’ या वर्गवारीत मोडत नसल्याचे सांगितले जाते. तो बहुतांश इतरांच्या नावे कामे करतो. यवतमाळातीलही एका युवतीच्या रजिस्ट्रेशनवर तो आपली कामे करतो.

Two tenders on the same road of Zilla Parishad | जिल्हा परिषदेच्या एकाच रस्त्यावर दोन निविदा

जिल्हा परिषदेच्या एकाच रस्त्यावर दोन निविदा

Next
ठळक मुद्देबांधकाम-२ चा अजब कारभार : पहिल्यांदाच कोल्डमीक्स डांबरीकरणाला मंजुरी, आक्षेप घेणार कोण ?

n  लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : एकाच रस्त्यावर सुधारणा व दुरुस्तीच्या दोन निविदा काढून त्या मंजूरही केल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार  जिल्हा परिषदेच्या बांधकाम  विभाग क्र. २ अंतर्गत उमरखेड तालुक्यात उघडकीस आला आहे. 
खरुस ते उंचवडद असा हा रस्ता असून दोन ते तीन किलोमीटर या लांबीत हे काम केले जाणार आहे. २० लाखांची निविदा रस्ता सुधारणेची तर आठ लाखांची निविदा पॅचेसची आहे. पीयूष नामक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याला ही कामे देण्याचा घाट आहे. वास्तविक हा कंत्राटदार ‘सुशिक्षित बेरोजगार अभियंता’ या वर्गवारीत मोडत नसल्याचे सांगितले जाते. तो बहुतांश इतरांच्या नावे कामे करतो. यवतमाळातीलही एका युवतीच्या रजिस्ट्रेशनवर तो आपली कामे करतो. पीयूषने यापूर्वी पांदण रस्त्यांची तब्बल २७ कामे उमरखेड तालुक्यात केली असून ती बहुतांश गुणवत्तेबाबत संशयास्पद व दुसऱ्याच्या नावे केलेली आहे. त्याने सादर केलेले बहुतांश अंदाजपत्रक सदोष राहते. मात्र दबावतंत्राचा वापर करून आपली कामे मंजूर करून घेतली जात आहे. खरुस ते उंचवडद या रस्त्यावर आधीच ८० व ४० एमएम थर देण्याचे काम झालेले असताना पुन्हा त्याचा प्रस्ताव कसा हा मुद्दा आहे. २० लाखांचे काम हे कोल्डमीक्सचे आहे. जिल्ह्यात १५ लाखांच्यावर एकही काम हॉटमिक्स शिवाय झालेले नाही. मग याच कामाला कोल्डमीक्सची मंजुरी कशी असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. पीयूषला हे काम मिळावे म्हणूनच हॉटमिक्सला मंजुरी दिल्याचे सांगितले जाते. एकाच लांबीच्या रस्त्यावर दोन कामे करायची कशी, आधी आठ लाखांचे काम होणार की २० लाखांचे आदी मुद्दे उपस्थित केले जात आहे. कंपनीतील मित्रत्व व नातेसंबंध सांगून पीयूष ही कामे पदरी पाडून घेतो. 
प्रदीप देवसटवार हे उमरखेडचे बांधकाम उपअभियंता असून त्यांच्याकडे जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र. २च्या कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त प्रभार आहे. त्यामुळे नियमबाह्य कामांवर आक्षेप घेणार कोण असा मुद्दा आहे. जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती संपूर्ण जिल्हाभर दर्जेदार व हॉटमिक्सच्या कामासाठी आग्रह धरतात, मात्र आता त्यांच्याच गृह तालुक्यातील विडूळ सर्कलमध्ये बांधकामातील गैरप्रकार पुढे आल्याने ते आता कुणावर कारवाई करतात याकडे नजरा लागल्या आहेत.   असाच प्रकार जिल्ह्यात इतरत्र असण्याची शक्यताही बांधकाम वर्तुळातून व्यक्त केली जाते. 

उमरखेडचा कारभार चालतो यवतमाळवरून 
उमरखेड बांधकाम उपविभागाचा कारभार यवतमाळवरून पाहिला जातो. पंचायत समितीच्या कामांना कप्लीशन सर्टिफीकेट (सीसी) बंधनकारक आहे. यासाठी पंचायत समितीतील संबंधित लिपिक आठवड्यातून दोन दिवस संपूर्ण रेकॉर्ड घेऊन यवतमाळला जात असल्याचे सांगितले जाते. देवसटवार साईटवर जात नाहीत, कार्यालयात बसून ‘सीसी’ देतात, कार्यालयात दुपारी १ नंतर उगवतात अशाही तक्रारी त्यांच्याबाबत कंत्राटदारांमधून ऐकायला मिळतात.

 

Web Title: Two tenders on the same road of Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.