सुकनेगावच्या जंगलात भुकेने व्याकूळ दोन बछड्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 07:58 PM2024-02-01T19:58:53+5:302024-02-01T20:00:48+5:30
वनविभागात खळबळ : बेपत्ता वाघिणीचा पथकांकडून शोध
संतोष कुंडकर/वणी (यवतमाळ) : वणी तालुक्यातील सुकनेगावलगतच्या जंगलात एका तलावाकाठी वाघिणीच्या दोन बछड्यांचा लागोपाठ मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उजेडात आली. यापैकी बुधवारी एकाचा, तर गुरुवारी दुसऱ्या बछड्याचा मृत्यू झाला. या बछड्यांची आई असलेली वाघिण बेपत्ता असून वन विभागाची पाच पथके तिचा शोध घेत आहेत. भुकेने व्याकूळ झाल्याने या बछड्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनअधिकाऱ्यांनी व्यक्त केला.वणी तालुक्यातील सुकनेगाव परिसरात महसूलचे जंगल आहे.
या जंगलात एक छोटेखानी तलाव आहे. या तलावाजवळ बुधवारी सकाळी एक मादी बछडा मृतावस्थेत आढळून आला. मंदर येथील नर्सरीत या बछड्याचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेला २४ तास उलटत नाही तोच, गुरुवारी सकाळी याच तलावाच्या परिसरात पुन्हा एका मादी बछड्याचा मृतदेह आढळून आला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी या बछड्याला गोरेवाडा (नागपूर) येथे रवाना केले. दरम्यान, या घटनेनंतर गुरुवारी सीसीएफ वसंत घुले, डीएफओ किरण जगताप, प्रभारी सहायक वनसंरक्षक शंकर हटकर, वणीचे आरएफओ प्रभाकर सोनटक्के यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
वाघिणीच्या शोधासाठी पाच पथके
दोन दिवसांपासून वाघिण या बछड्यांपासून दूर गेली आहे. या बछड्यांचे वय दोन ते तीन महिने इतके असल्याने वाघिणीच्या दुधावरच त्यांचे पोषण सुरू होते. मात्र वाघिण दूर निघून गेल्याने या बछड्यांना दूध मिळाले नाही, परिणामी त्यांचा भूकेमुळे मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनअधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या वाघिणीला शोधण्यासाठी वन विभागाची पाच पथके घटनेनंतर संपूर्ण जंगल पिंजून काढत आहेत. मात्र, कुठेही वाघिणीच्या पायाचे ठसे आढळून आले नाहीत.
दोन्ही बछड्यांचे वय अगदी लहान असल्याने ते शिकार करू शकत नव्हते. वाघिणीच्या दुधावरच त्यांची भूक भागत होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून वाघिणीपासून हे बछडे दुरावले. भूकने व्याकूळ होऊनच त्यांचा मृत्यू झाला, असा अंदाज आहे. वाघिणीच्या हालचाली टिपण्यासाठी परिसरात १० ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.- प्रभाकर सोनडवले, आरएफओ, वणी.