खाण परिसरात दोन वाघांचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 10:43 PM2018-11-06T22:43:17+5:302018-11-06T22:44:00+5:30
तालुक्याच्या पूर्व भागातील वेकोलिच्या खाण परिसरात दोन वाघांचा संचार होत असल्याने मागील दोन महिन्यापासून नागरिक दहशतीखाली वावरत आहे. वाघाच्या भितीने श्ेताकऱ्यांना कामासाठी मजुर मिळणे अवघड झाले असून शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतात एकटेदुकटे जाण्यास भीती वाटत आहे.
विनोद ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : तालुक्याच्या पूर्व भागातील वेकोलिच्या खाण परिसरात दोन वाघांचा संचार होत असल्याने मागील दोन महिन्यापासून नागरिक दहशतीखाली वावरत आहे. वाघाच्या भितीने श्ेताकऱ्यांना कामासाठी मजुर मिळणे अवघड झाले असून शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतात एकटेदुकटे जाण्यास भीती वाटत आहे.
तालुक्याच्या पूर्व भागात वेकोलिच्या पाच ते सहा खुल्या कोळसा खाणी आहेत. खाणीच्या मानवनिर्मीत दºया व मातीच्या ढिगाऱ्याचे डोंगर झाले आहे. या डोंगरावर झुडूपे वाढल्याने जंगल सदृश्य परिसर बनला आहे. लागूनच केसुर्ली व शेवाळांचे जंगलही आहे. त्यामुळे येथे दोन वाघांनी आपले बस्तान मांडले आहे. मागील दोन महिन्यापासून अनेकांना या वाघांनी दर्शन दिले आहेत. काही दिवसांपूर्वी शिरपूर परिसरात हा वाघ लोकांनी पाहिला. महिनाभरापूर्वीच सुंदरनगरच्या शाळेजवळ भरदिवसा हा वाघ येऊन गेला. आता दोन दिवसांपूर्वी कोलारपिंपरी खाण परिसरात अनेकांनी या पट्टेदार वाघाला पाहिले. या वाघांनी आतापर्यंत माणसांवर हल्ला केला नसला तरी अनेक जनावरांना फस्त केले आहे.
मागील आठवड्यातच केसुर्ली जंगलात दोन गायींना वाघाने ठार मारले. १५ दिवसांपूर्वी उकणी परिसरात एक गोऱ्हा वाघाने मारला, तर अनेक जनावरांवर हल्ले करून जखमी केले आहे. गुराख्यांनीही अनेकदा वाघ बघितले आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर येथील वनविभागाने केसुर्ली व निलजई परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले. या कॅमेऱ्यातही हे दोन्ही वाघ टिपले गेले, अशी माहिती वनविभागाचे अधिकारी पटवारी यांनी दिली. मात्र वरिष्ठ पातळीवरून या वाघांना पकडण्याचे कोणतेही आदेश न आल्याने वाघांना पकडता येत नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक, गुराखी, शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना वनविभागाने दिल्या आहेत. तसेच ठिकठिकाणी वनविभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शेतात फुटून असलेला कापूस वेचण्यासाठी मजूर धजावत नसल्याने शेतकºयांमध्ये चिंता पसरली आहे.
वेकोलि कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती
वेकोलिमध्ये तीन पाळ्यांमध्ये काम सुरू असते. त्यामुळे कर्मचारी व कामगारांना रात्रपाळीतही कामावर जावे लागते. परंतु वाघाच्या संचारामुळे वेकोलि कामगारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. कामगारांनी रात्रीच्यावेळी एकटे-दुकटे येण्याचे टाळावे, अशा सूचना वेकोलि प्रशासनाने कामगारांना देण्याची गरज असल्याचे येथील उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.