एसटी बस अपघातात दोन महिला ठार

By admin | Published: June 23, 2017 05:17 PM2017-06-23T17:17:52+5:302017-06-23T17:17:52+5:30

चालकाचे नियंत्रण गेल्याने भरधाव एसटी बस झाडावर आदळून रस्त्याच्या कडेला जावून उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात पंढरपूरला जाणाऱ्या दोन महिला ठार तर १३ प्रवासी जखमी झाले.

Two women killed in ST bus accident | एसटी बस अपघातात दोन महिला ठार

एसटी बस अपघातात दोन महिला ठार

Next

आॅनलाईन लोकमत
उमरखेड (यवतमाळ) : चालकाचे नियंत्रण गेल्याने भरधाव एसटी बस झाडावर आदळून रस्त्याच्या कडेला जावून उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात पंढरपूरला जाणाऱ्या दोन महिला ठार तर १३ प्रवासी जखमी झाले. हा अपघात नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील उमरखेड तालुक्यातील चिंचोली फाट्याजवळ शुक्रवारी पहाटे १.३० वाजताच्या सुमारास घडला.
शांताबाई अंबादास धाडवे (८०) रा.पिंपरी भिवापूर ता.हिंगणघाट जि.वर्धा आणि उमाबाई लहूजी कौड (५५) रा.अलीपूर जि.वर्धा असे मृत महिलांची नावे आहे. तर इन्तियाज मो.इसाक (३०) रा.उमरखेड, रसूल जिलाणी सैयद (३०) रा.खिल्लारी (लातूर), धोंडीराम पांडुरंग नागरगोजे (२३) पाटोदा (लातूर), प्रकाश ईश्वर नकवान (५५) रा.पुसद, दत्तात्रय राजाराम कऱ्हाळे (३५) रा.मुंबई, जिजाबाई रामराव दाते (५०) रा.गिरड (वर्धा), विमल रमेशराव पोलकवडे (५०) रा.बोरगाव (वर्धा), मनोहर प्रकाश बोंबले (४८), किशोर सखाराम पोदाडे (२६), मारोती रमेश मस्के (२४) सर्व रा.पुसद आणि बसचालक वाल्मिक केशव केंद्रे (३५) रा.अहमदपूर जि.लातूर अशी जखमींची नावे आहे.
नागपूर आगाराची नागपूर-नांदेड हिरकणी बस (क्र.एम.एच.१४/ बी.टी.-४८२३) गुरुवारी रात्री प्रवासी घेवून नांदेडकडे जात होती. नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर चिंचोली फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण गेले आणि बस बाभळीच्या झाडावर आदळून रस्त्याच्या कडेला जावून उलटली. रात्रीच्या अंधारात कुणालाच काही कळायला मार्ग नव्हता. प्रवासी आरडाओरडा करीत होते. काही वेळानंतर या घटनेची माहिती नाग चौकातील मुस्लीम तरुणांना मिळाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सर्वांनी मिळून जखमींना तत्काळ उमरखेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. शांताबाई धाडवे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर गंभीर जखमींना नांदेड येथे उपारासाठी रवाना केले. दरम्यान, उमाबाई कौड या महिलेचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींच्या हात, पाय, डोक्याला गंभीर मार लागला आहे. घटनेची तक्रार वाहक तुकाराम विश्वनाथ साबळे यांनी उमरखेड पोलिसात दिली. अपघातात ठार झालेल्या शांताबाई आणि उमाबाई या दोघी जणी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात होत्या. परंतु मधातच नियतीने डाव साधला.

मुस्लीम तरुणांची तत्परता
चिंचोली फाट्याजवळ एसटी बसला अपघात झाल्याची माहिती नाग चौकात असलेल्या काही मुस्लीम तरुणांना माहीत झाली. त्यांनी तत्काळ इतरांना बोलावून मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. उमरखेडमधील सामाजिक संघटनाही त्यांच्या मदतीला आल्या. जखमींना रुग्णालयात नेवून त्यांच्यावर उपचार करेपर्यंत ही मंडळी थांबून होती. या तरुणांनी वेळीच धाव घेतली नसती तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता होती.

Web Title: Two women killed in ST bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.