दोन वर्षांपूर्वीच फुटले असते भूखंड घोटाळ्याचे बिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 10:29 PM2018-10-16T22:29:35+5:302018-10-16T22:29:53+5:30
मयताच्या नावावर तोतया भूखंड मालक उभा करून व बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केली गेल्याची तक्रार एका महिला डॉक्टरने दोन वर्षांपूर्वीच लोहारा पोलिसांकडे केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मयताच्या नावावर तोतया भूखंड मालक उभा करून व बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केली गेल्याची तक्रार एका महिला डॉक्टरने दोन वर्षांपूर्वीच लोहारा पोलिसांकडे केली होती. त्या तक्रारीची तेव्हाच तत्परतेने पोलिसांनी दखल घेतली असती तर भूखंड घोटाळा आणि त्याआड बँका, भूखंडधारकांची आज झालेली कोट्यवधींची फसवणूक टाळता आली असती.
येथील डॉ. सारिका महेश शाह (शिंदे प्लॉट, यवतमाळ) यांनी ५ आॅगस्ट २०१६ रोजी लोहारा पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीची प्रत ‘लोकमत’कडे सादर केली आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे भूखंड घोटाळ्याला वाव मिळाल्याच्या या प्रकरणाचे बिंग फुटले. डॉ. सारिका शाह यांनी सांगितले की, २०१३ मध्ये विजय महल्ले नामक व्यक्ती त्यांच्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत होता. त्याच्यावर आमचा विश्वास होता. त्याच्या माध्यमातून वाघापूर येथील सावित्रीबाई फुले सोसायटी दोन हजार २४९ चौरस फूट क्षेत्रफळाचा प्लॉट आम्ही विकत घेतला. त्यापोटी तीन लाखांचा सौदा केला. त्यावेळी विजयने भूखंड मालक व अन्य काहींची ओळख करून दिली होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी भूखंड मालक कृष्णराव सुरोशे यांचा मुलगा आम्हाला भेटला व तुम्ही भूखंड कसा खरेदी केला अशी विचारणा त्याने केली. कारण आपले वडील १९९४ लाच मरण पावल्याचे त्याने सांगितले. हा प्रकार ऐकून धक्काच बसला. त्यानंतर विजय महल्ले व त्याच्या साथीदारांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा थांगपत्ता लागला नाही. दरम्यान कृष्णराव सुरोशे मयत असताना त्यांच्या नावावर उभा झालेला व्यक्ती तोतया असल्याचे व त्यांची कागदपत्रेही बोगस असल्याचे निष्पन्न झाले. तीन लाखांनी फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्याने आम्ही ५ आॅगस्ट २०१६ रोजीच या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद नोंदविली. फसवणूक कशी झाली व ती कुणी केली त्यांची नावेही त्यात नमूद केल्याचे सारिका शाह यांनी सांगितले.
एकच भूखंड पुन्हा विकला
विशेष असे, शाह यांना प्लॉट विकल्यानंतर त्या व्यक्तींनी आणखी तिसऱ्याला त्यातील अर्धा भूखंड पुन्हा विकून त्यांचीही फसवणूक केली. वास्तविक डॉ. सारिका शाह यांनी दोन वर्षापूर्वीच भूखंड खरेदीतील हा गैरप्रकार लोहारा पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला होता. मात्र तत्कालीन ठाणेदारांनी त्याची गांभीर्याने दखल न घेता ही तक्रार थंडबस्त्यात टाकली. तक्रार होऊनही कारवाई न झाल्याने भूमाफिया टोळीची हिंमत वाढली व त्यांनी तोच पॅटर्न वापरत यवतमाळ शहरात अनेकांना गंडा घातला. अशाच पद्धतीने तोतया मालक उभा करून अनेक भूखंडधारकांची फसवणूक केली. मूळ मालक नसताना एकाच भूखंडावर अनेक बँकांचे कर्ज उचलून बँकांचीही कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली. लोहारा पोलिसांनी दोन वर्षांपूर्वीच तक्रारीची दखल घेतली असती तर भूखंड घोटाळा आणि बँकांची झालेली कोट्यवधींची फसवणूक टाळता आली असती, हेच डॉ. सारिका शाह यांच्या तेव्हाच्या तक्रारीवरून स्पष्ट होते. विश्वासू माणसानेच आमची फसवणूक केली, भूखंड घोटाळ्यात आमचा कोणताही सहभाग नसल्याचे डॉ. सारिका शाह यांनी सांगितले.
दुय्यम निबंधक संशयाच्या भोवऱ्यात
भूखंड खरेदी-विक्री प्रकरणात येथील दुय्यम निबंधक कार्यालयाची भूमिका महत्वाची असते. कागदपत्रांची शहानिशा करण्याची जबाबदारी त्यांची असते. फोटो ओळखपत्राची खातरजमा या कार्यालयाने करणे आवश्यक आहे. मात्र हे कार्यालय सदर काम प्रामाणिकपणे करीत नसल्यानेच भूखंड घोटाळ्यात माझ्यासह अनेकांची फसवणूक झाल्याचे व या कार्यालयाचा एकूणच कारभार संशयास्पद असल्याचे डॉ. सारिका शाह यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.