वाहन झाडावर आदळून लाडखेडचे दोन तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 09:32 PM2019-07-08T21:32:45+5:302019-07-08T21:33:05+5:30
यवतमाळ मार्गावरील बाणायत ते नांदगव्हाण दरम्यान भरधाव टाटा एस मालवाहू वाहन झाडावर आदळल्याने येथील दोन तरुण ठार झाले. ही घटना रविवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाडखेड : यवतमाळ मार्गावरील बाणायत ते नांदगव्हाण दरम्यान भरधाव टाटा एस मालवाहू वाहन झाडावर आदळल्याने येथील दोन तरुण ठार झाले. ही घटना रविवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
उज्ज्वल गजानन दातीर (२१) आणि आशीष ज्ञानदेव नैताम (२२) अशी मृतांची नावे आहे. हे दोघेही लाडखेड येथील रहिवासी असून यवतमाळच्या रेमण्ड कंपनीत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत होते. रविवारी १२ वाजताच्या सुमारास वाहनाने (एम.एच.३७/जे.१९३८) ते यवतमाळ येथून लाडखेडला येत होते. बाणायत ते नांदगव्हाण दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने हे वाहन रस्त्यालगतच्या लिंबाच्या झाडावर आदळले. यात उज्ज्वल व आशीष गंभीर जखमी झाले. मात्र रात्रीची वेळ असल्याने त्यांना मदत मिळाली नाही.
रात्री उशिरा त्यांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच लाडखेडचे पीएसआय राजू दरोडे यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनीच जखमींना रुग्णालयात नेले.
होतकरूंचा नाहक बळी
दोन्ही मृत तरुण गरीब कुटुंबातील होते. परिवाराचा उदरनिर्वाह त्यांच्यावरच अवलंबून होता. उज्ज्वल याचे आई आणि वडील हयात नाही. तो लाडखेड येथे आत्याकडे राहात होता. त्याला एक लहान भाऊ आहे. आशीषसुद्धा कुटुंबातील कर्ता होता. गावात हळहळ व्यक्त होत आहे.