ग्रामीण भागात वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:09 AM2021-07-13T04:09:37+5:302021-07-13T04:09:37+5:30
पांढरकवडा : पावसाळ्याच्या दिवसात तालुक्यातील ग्रामीण भागात वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले असून ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...
पांढरकवडा : पावसाळ्याच्या दिवसात तालुक्यातील ग्रामीण भागात वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले असून ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाची छोटी सरदेखील आली किंवा थोडी हवा जरी सुटली तरी ग्रामीण भागातील वीज पुरवठा बंद होतो. नंतर विद्युत पुरवठा केव्हा सुरू होईल, याचा नेम नाही. जोरात विजा कडाडल्या किंवा वादळी धुवाधार पाऊस झाला, तर विद्युत पुरवठा खंडित होणे अपेक्षित आहे. परंतु थोडी जरी हवा सुटली, तुरळक पाऊस आला तरी, विद्युत पुरवठा बंद होतो. त्यामुळे ग्राहकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. एकदा खंडित झालेला विद्युत पुरवठा केव्हा सुरू होईल, हे सांगता येत नाही. अनेकदा तर ग्रामस्थांना अंधारात रात्र काढावी लागते. विद्युत प्रवाह जाणाऱ्या तारांजवळची झाडेझुडपे छाटण्याचे काम महावितरणने पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे उन्हाळ्यातच करावयास पाहिजे. परंतु ही कामे ऐन पावसाळ्यात केली जातात. त्यामुळे वीज ग्राहकांना त्याचा त्रास होतो. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याची त्वरित दाखल घ्यावी, अशी ग्रामीण भागातील जनतेची मागणी आहे.