टंकलेखनाचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 10:05 PM2019-07-28T22:05:02+5:302019-07-28T22:06:07+5:30
दोन वर्षे मिळालेली मुदतवाढ संपल्याने मॅन्युअल टंकलेनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा कोर्स बंद झाल्यास लाखो विद्यार्थी प्रशिक्षणापासून वंचित राहतील, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे मुदतवाढ मिळाल्याच्या दोन वर्षांच्या कालावधीत राज्यात तीन लाख विद्यार्थ्यांनी हा कोर्स केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दोन वर्षे मिळालेली मुदतवाढ संपल्याने मॅन्युअल टंकलेनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा कोर्स बंद झाल्यास लाखो विद्यार्थी प्रशिक्षणापासून वंचित राहतील, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे मुदतवाढ मिळाल्याच्या दोन वर्षांच्या कालावधीत राज्यात तीन लाख विद्यार्थ्यांनी हा कोर्स केला आहे.
संगणक टायपिंग सुरू करून मॅन्युअल टंकलेखन बंद करण्याचा निर्णय शासनाने नोव्हेंबर २०१७ मध्ये घेतला होता. त्यावेळी झालेल्या पाठपुराव्यामुळे दोन वर्षे मुदतवाढ मिळाली. संगणक टायपिंग विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना भुर्दंड बसणारी आहे, अशी बाजू मांडण्यात आली होती. त्यावेळी मिळालेली मुदतवाढ गरीब विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरली. संगणक (जीसीसी-टीबीसी) टायपिंग कोर्समध्ये समस्याही अधिक आहेत. या व इतर बाबींचा विचार करून मॅन्युअल टंकलेखन सुरू राहू द्यावे, अशी मागणी होऊ लागली आहे.
शासनाच्या पदभरतीमध्ये संगणक टायपिंग (जीसीबी-टीबीसी) कोर्सला संगणक अर्हता म्हणून मान्यता नाही. या प्रशिक्षणाला केवळ टायपिंग कोर्स म्हणून स्वीकारले जात आहे. अशावेळी अगाऊ शुल्क भरून प्रशिक्षण घेण्याचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिल्लीसह १२ राज्यात मॅन्युअल टंकलेखन सुरू आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश, केरळ या राज्यात आजही हाच कोर्स सुरू आहे. महाराष्ट्रातही हाच कोर्स सुरू राहावा यासाठी संघर्ष समितीने लढा उभारला आहे.
की-बोर्डद्वारे गैरप्रकार
परीक्षा केंद्रावरील अत्याधुनिक संगणक लॅबमध्ये की-बोर्ड पुरविण्याच्या माध्यमातून गैरप्रकार होत आहे. एकाच रांगेत संस्थाचालक आपले की-बोर्ड लाऊन आॅब्जेक्टिव्ह प्रश्नांमध्ये सामूहिक कॉपी करत असल्याचा आरोप केला जात आहे. शासनाने कुणालाही जीसीसी-टीबीसी प्रशिक्षण सॉफ्टवेअर तयार करण्याची किंवा विक्रीची परवानगी दिलेली नाही. तरीही ते बाजारात उपलब्ध होत आहे. डुप्लिकेट परीक्षेचाही प्रकार वाढला आहे. टंकलेखन व संगणक टंकलेखन प्रशिक्षण संस्थेत इतर कोणताही कोर्च चालविण्यावर बंदी आहे. तरीही काही ठिकाणी ईटीएच व इतर कोर्स जीसीसी-टीबीसीच्या सेटवर चालविले जात आहे. या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
मॅन्युअल टंकलेखन कायमस्वरूपी सुरू राहावे यासाठी शिक्षणमंत्री आशिष शेलार, विनोद तावडे यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. हा कोर्स सुरू राहण्यासाठी प्रयत्न केले जाईल, असे आश्वासन मिळाले.
- दिनेश हरणे, अध्यक्ष
मॅन्युअल टंकलेखन आणि संगणक टंकलेखन संघर्ष समिती