अब की बार भाजप तडीपार...राळेगावमध्ये उद्धव ठाकरे गरजले

By विशाल सोनटक्के | Published: March 12, 2024 05:52 PM2024-03-12T17:52:25+5:302024-03-12T17:54:42+5:30

आता 'अब की बार चारसौ पार'ची नव्हे तर 'अब की बार भाजप तडीपार'ची तयारी मतदार करीत असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

Uddhav Thackeray says Ab Ki Baar BJP Tadipar in Ralegaon | अब की बार भाजप तडीपार...राळेगावमध्ये उद्धव ठाकरे गरजले

अब की बार भाजप तडीपार...राळेगावमध्ये उद्धव ठाकरे गरजले

राळेगाव (यवतमाळ) : याच यवतमाळमध्ये काही दिवसांपूर्वी भाजपची सभा झाली. म्हणे, यवतमाळमध्ये सभा घेतली की भाजपला यश मिळते. हे पूर्वीचे झाले. तेव्हा ठाकरेंची शिवसेना सोबत होती. आता 'अब की बार चारसौ पार'ची नव्हे तर 'अब की बार भाजप तडीपार'ची तयारी मतदार करीत असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. निवडणूक रोख्यावरूनही त्यांनी भाजपला चांगलेच फटकारले. मिळत असलेल्या माहितीनुसार, ५० वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या खात्यात निवडणूक रोख्यातून ६०० कोटी जातात, तर दहा वर्षे सत्तेत असलेल्या भाजपच्या खात्यात सहा ते सात हजार कोटी रुपये पडतात. यावरूनच कोणता पक्ष देशाला लुटत आहे हे स्पष्ट होते, असे सांगत भ्रष्टाचाराचे पाठीराखे असलेल्या भाजपला येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राळेगाव येथील गांधी मैदानावर मंगळवारी दुपारी जनसंवाद सभा झाली. भरदुपारी झालेल्या या सभेला तळपत्या उन्हातही सुमारे २० हजारांवर नागरिकांचा जनसमुदाय उपस्थित होता. याचाच धागा पकडत उद्धव ठाकरे म्हणाले, दुपारचे अडीच वाजले आहेत. मात्र, उन्हाची पर्वा न करता तुम्ही एवढ्या प्रचंड गर्दीने भाषणासाठी थांबला आहात. यालाही भाग्य लागते. नाहीतर लाखोंची बिर्याणी चारूनही विरोधकांच्या सभेतील खुर्च्या रिकाम्या राहतात. तर इकडे एकही भाडोत्री आणलेला नसताना सभेला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित आहे. यवतमाळच्या दोघांनी गद्दारी केली आहे. या दोघांनी केवळ शिवसेनेशीच नाही तर तुम्हा जनतेचाही विश्वासघात केल्याचे सांगत खोक्यात बंद झालेल्या या गद्दारांना धडा शिकविण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.

मागील दहा वर्षांत भाजपवाल्यांनी शेतकरी कष्टकऱ्यांना याच यवतमाळमधून काय आश्वासने दिली होती, ते एकदा आठवा. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची ग्वाही दिली होती. उत्पन्न दुप्पट झाले का, अशी विचारणा करीत कापसाचा भाव ११ हजार होता तो आता सात हजारांवर आला आहे. तिच स्थिती सोयाबीनची आहे. दुसरीकडे शेतीसाठीचा लागवड, बी-बियाण्यांचा खर्च दुप्पट झाला आहे आणि हजार-दोन हजारांची मदत खात्यावर टाकून हे सरकार टेंभा मिरवित असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपसह शिंदे गटावर टीका केली. हे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात चार हजार ७५६ आत्महत्या झाल्या आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. पाणंद रस्त्यासाठी निधी दिला, घेणाऱ्यांनी टक्केवारी खाल्ली, मात्र त्यानंतरही बारमाही रस्त्यापासून जिल्ह्यातील वाडे-तांडे दूर असल्याचे ते म्हणाले. समाजातील विद्यार्थ्यांच्या होस्टेलसाठीचा मुंबईतील भूखंड स्वत:च्या ट्रस्टच्या नावे करवून घेणाऱ्यांनाही येणाऱ्या निवडणुकीत जाब विचारा, असे आवाहन दानवे यांनी केले.

मंचावर माजी मंत्री संजय देशमुख, शिवसेनेचे प्रवक्ते किशोर तिवारी, माजी आमदार विश्वास नांदेकर, दुष्यंत चतुर्वेदी, संगीता ढवळे, आशावरी देशमुख, उद्धव कदम यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक संजय देशमुख यांनी केले. या जिल्ह्यातील मतदार मागील २५ वर्षांपासून शिवसेनेसोबत राहिला आहे. याच सेनेच्या बळावर दोघेजण मोठे झाले. मात्र, त्यांनी गद्दारी केली. ते सेनेसोबत होते म्हणून रूबाब होता. आता ठाकरे घराण्याचे नाव सोबत नसल्यावर काय होते हे त्यांना येणाऱ्या निवडणुकीत कळेल, असे ते म्हणाले. राळेगाव येथे आगमन होताच उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर वीर बापूराव शेडमाके यांच्या प्रतिमेला हार घातला. बाजार समितीच्या वतीने माजी मंत्री वसंत पुरके, काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल मानकर यांनी ठाकरे यांचे स्वागत केले.

Web Title: Uddhav Thackeray says Ab Ki Baar BJP Tadipar in Ralegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.