उईके, येरावार, राठोड बोदकुरवार ‘रिपीट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 06:00 AM2019-10-02T06:00:00+5:302019-10-02T06:00:05+5:30

आर्णीमध्ये माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांना भाजपने रिंगणात उतरविले आहे. उमरखेड व पुसद मतदारसंघाचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाही. उमरखेड मतदारसंघ रिपाइंने मागितला आहे. मात्र भाजप श्रेष्ठी हा मतदारसंघ पूर्णत: रिपाइंसाठी सोडण्यास अजूनही तयार नसल्याचे सांगितले जाते.

Uike, Yerawar, Rathod Bodkurwar 'Repeat' | उईके, येरावार, राठोड बोदकुरवार ‘रिपीट’

उईके, येरावार, राठोड बोदकुरवार ‘रिपीट’

Next
ठळक मुद्देआर्णीत संदीप धुर्वे : वणीत मनसेचे उंबरकर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या वाट्याच्या सहा पैकी चार मतदारसंघात उमेदवार घोषित केले आहे. त्यापैकी तीन जागांवर जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली.
यवतमाळ विधानसभा मतदारसंघात ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वास्तविक काही सर्वेक्षणांमध्ये येरावार यांच्या विरोधात पक्ष, संघटना व जनतेमध्ये नाराजी असल्याचा अहवाल गेला होता. मात्र त्या अहवालाचा येरावारांच्या उमेदवारीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसते. राळेगाव मतदारसंघातून आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके तर वणी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. आर्णीचे वादग्रस्त आमदार प्रा. राजू तोडसाम यांचा पत्ता कापण्यात आला. या मागे पांढरकवड्यातील सत्ताधाऱ्यांशी जवळीक असलेल्या दोन नेत्यांचा विरोध कारणीभूत ठरल्याचे सांगितले जाते. आर्णीमध्ये माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांना भाजपने रिंगणात उतरविले आहे. उमरखेड व पुसद मतदारसंघाचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाही. उमरखेड मतदारसंघ रिपाइंने मागितला आहे. मात्र भाजप श्रेष्ठी हा मतदारसंघ पूर्णत: रिपाइंसाठी सोडण्यास अजूनही तयार नसल्याचे सांगितले जाते. ‘उमेदवार तुमचा चिन्ह आमचे’ हा भाजपचा रिपाइं (ए) समोर प्रस्ताव आहे. मात्र त्याचा निर्णय न झाल्याने मंगळवारी जाहीर झालेल्या यादीत उमरखेडचे नाव नाही. राजेंद्र नजरधने तेथे भाजपचे विद्यमान आमदार आहे. पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. पुसद मतदारसंघ भाजपने शिवसेनेकडून मागून घेतला आहे. विधान परिषद सदस्य नीलय नाईक तेथे उमेदवार होऊ शकतात. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका नाराज गटाची नीलय नाईकांना साथ असल्याचेही सांगितले जात आहे. नीलय नाईकांना साथ म्हणजे राष्ट्रवादीच्या नाराज गटाचा आमदार मनोहरराव नाईकांना विरोध हे स्पष्ट आहे. पुसद व उमरखेडच्या जागांवरील उमेदवार कोण? याची उत्सुकता भाजपच्या गोटात पहायला मिळते.
शिवसेनेने मंगळवारी जाहीर केलेल्या १२४ मतदारसंघांमध्ये जिल्ह्यातील केवळ दिग्रसचा समावेश असून महसूल राज्यमंत्री संजय राठोड तेथे उमेदवार आहेत. मनसेने जाहीर केलेल्या २७ उमेदवारांमध्ये वणी मतदारसंघातून राजू उंबरकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

एकच जागा मिळाल्याने शिवसैनिक संतप्त
वणीपासून उमरखेडपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व, पक्षसंघटनेत गावखेड्यापर्यंत बांधणी असताना जिल्ह्यातील सात पैकी केवळ एक परंपरागत मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला आल्याने तमाम शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप पहायला मिळत आहे. शिवसैनिकांच्या संतप्त भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. जिल्ह्यात तीन पैकी दोन खासदार सेनेचे, एक राज्यमंत्री, तीन जिल्हा प्रमुख एवढा पसारा असताना एकाच जागेवर जिल्हा नेतृत्वाने समाधान मानले कसे असा संतप्त सवालही उपस्थित होत आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या यादीची प्रतीक्षाच
काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नसले तरी उशिरा रात्री ही यादी येण्याची अपेक्षा आहे. या यादीत काँग्रेसमध्ये फार काही चेंज नसल्याचेही सांगितले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पुसद व दिग्रस विधानसभा लढणार आहे. मात्र दिग्रसमध्ये पक्षाचा अधिकृत उमेदवार की अपक्षाला पाठिंबा याचा पेच कायम आहे. पुसदमध्ये मनोहरराव नाईक यांच्या कुटुंबातील तरुण राष्ट्रवादीचे घड्याळ हाताला बांधण्याची चिन्हे आहेत.

गुरुवार, शुक्रवारी गर्दी
बुधवार २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीची सुटी असल्याने नामांकन दाखल होणार नाही. मात्र उद्यापर्यंत उमेदवारीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याचीही शक्यता आहे. त्यानंतर ३ व ४ ऑक्टोबर रोजी नामांकन दाखल करणाऱ्यांची सर्वाधिक गर्दी होणार आहे. या नामांकनाच्या आड शक्तीप्रदर्शनही करण्याची तयारी केली जात आहे.

मतांची आघाडीही फेल
लोकसभा निवडणुकीत ५८ हजार मतांची आघाडी देऊनही आर्णीत भाजप आमदार राजू तोडसाम यांचे तिकीट कापले गेल्याने राजकीय गोटात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वैयक्तिक भानगडी त्यांंना भोवल्याचेही सांगितले जाते.

Web Title: Uike, Yerawar, Rathod Bodkurwar 'Repeat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.