युक्रेन-रशियाच्या युद्धाने सोयाबीन सात हजार १०० वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 08:30 AM2022-02-25T08:30:00+5:302022-02-25T08:30:02+5:30
Yawatmal News युक्रेन आणि रशियाच्या युद्धाने सोयाबीनच्या दरात अचानक तेजी आली. हे दर सात हजार १०० रुपये क्विंटलच्या घरात पोहोचले आहेत.
रुपेश उत्तरवार
यवतमाळ : गॅट करारामुळे जागतिक घडामोडींचा स्थानिक बाजारपेठेवर थेट परिणाम होत आहे. यातून खुल्या बाजारात बुधवारी सोयाबीनला विक्रमी दर मिळाले. युक्रेन आणि रशियाच्या युद्धाने सोयाबीनच्या दरात अचानक तेजी आली. हे दर सात हजार १०० रुपये क्विंटलच्या घरात पोहोचले आहेत. अचानक झालेल्या या दरवाढीने सर्वांनाच धक्का बसला आहे.
जागतिक बाजारात सोयाबीनची मागणी अत्यल्प होती. त्याचे दरही फारसे नव्हते. मात्र, युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे प्रारंभी सोन्याच्या आणि चांदीच्या दरात तेजी आली. आता सोयाबीनच्या दरात ही तेजी पाहायला मिळत आहे. याशिवाय ब्राझीलचे सोयाबीनचे उत्पादन कमी पावसाने घटले असून त्याचाही परिणाम सोयाबीनच्या दरावर झाला आहे.
खुल्या बाजारात सोयाबीनचे दर वाढणार नाही, अशी संपूर्ण परिस्थिती असताना युद्धाच्या घटनेने दरामध्ये मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. सोयाबीनचे हे दर वाढले असले, तरी शेतकऱ्यांकडे मात्र सोयाबीन राहिलेले नाही. यामुळे दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच होण्याची शक्यता आहे.
गत वर्षाची पुनरावृत्ती
गतवर्षी मेमध्ये सोयाबीनचे दर दहा हजार रुपये क्विंटलच्या घरात पोहोचले होते. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. परतीच्या पावसाने सोयाबीनचे उत्पादन घटल्याने ही दरवाढ नोंदविण्यात आली होती. मात्र, यानंतर खरिपात सोयाबीनचे नवे उत्पादन हाती आल्यानंतर या दरात मोठी घसरण झाली. दर साडेपाच ते सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत खाली आले. आता युद्ध भडकल्याने सोयाबीनचे दर भडकले आहेत. पशुखाद्य म्हणून सोयाबीनच्या ढेपेचा वापर करण्यात येतो. याशिवाय तेलासाठीही त्याची मागणी असते. तेल बियाणे उत्पादन घटल्याने पुन्हा गतवर्षाच्या दरवाढीची पुनरावृत्ती पाहायला मिळत आहे.
युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा परिणाम सोयाबीनच्या दरवाढीवर झाला आहे. याशिवाय विदेशात सोयाबीनचे उत्पादन पाहिजे तसे आले नाही. यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. यात आणखी थोडी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- विजय मुंधडा, व्यापारी