उमरसरा येथे तरुणाचा निर्घृण खून

By Admin | Published: February 26, 2015 01:56 AM2015-02-26T01:56:05+5:302015-02-26T01:56:05+5:30

सिमेंटच्या बाकावर झोपून असलेल्या एका तरुणाच्या डोक्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी टणक वस्तूने जोरदार प्रहार करून त्याला जागीच ठार केले.

Umarasara youthful murder of the youth | उमरसरा येथे तरुणाचा निर्घृण खून

उमरसरा येथे तरुणाचा निर्घृण खून

googlenewsNext

यवतमाळ : सिमेंटच्या बाकावर झोपून असलेल्या एका तरुणाच्या डोक्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी टणक वस्तूने जोरदार प्रहार करून त्याला जागीच ठार केले. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास येथील उमरसरा परिसरातील तीन फोटो चौकात घडली. याप्रकरणी चार संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. मात्र घटनेचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.
प्रवीण ऊर्फ पऱ्या शामराव वानखडे (२१) रा. गौळपेंड, ता. दारव्हा असे मृताचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून तो येथील उमरसरा परिसरातील गोवर्धन ले-आऊटमध्ये आई ललिता वानखडे यांच्यासह वास्तव्याला होता. तसेच तणस विक्रीचा व्यवसाय करीत होता. मंगळवारी रात्री तो तीन फोटो चौकातील एका टपरीसमोरील बाकावर झोपून होता. दरम्यान तेथे अज्ञात तिघे जण आले. यावेळी संधी साधून त्यांनी पऱ्यावर टणक वस्तूने प्रहार केला. त्यामध्ये डोक्याला जबर दुखापत होऊन प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्यातच पऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले. ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ घटनेची माहिती वडगाव रोड पोलिसांना दिली. त्यावरून पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पाठोपाठ उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदने, ठाणेदार बाळकृष्ण जाधव, फौजदार केंद्रे, स्थानिक गुन्हे शाखा आदी पथकेही तेथे पोहोचली. यावेळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. त्यानंतर पऱ्याची आई ललिता वानखडे यांची रितसर तक्रार घेऊन अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध वडगाव रोड पोलिसांनी भादंवि ३०२ कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल केला. रात्रीच पोलिसांनी गोपनीय माहितीवरून मारेकऱ्यांचा शोध घेतला.
मात्र थांगपत्ता लागला नाही. अखेर वडगाव रोड पोलिसांनी चार संशयीतांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली. मात्र त्यांच्यापैकी कुणीही घटनेची कबुली अथवा माहिती दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
मारेकऱ्यांची नावेच पुढे आली नसल्याने पऱ्याचा खुन नेमका कोणत्या कारणावरून झाला हेही अद्याप गुलदस्त्यात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Umarasara youthful murder of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.