उमरखेडची शाळा आता भरणार कुठे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 10:49 PM2018-06-24T22:49:39+5:302018-06-24T22:50:12+5:30
महिनाभरापूर्वी झालेल्या वादळात येथील शासकीय माध्यमिक शाळेवरील टिनपत्रे उडून गेली. महिना लोटूनही अद्याप शाळेची दुरुस्ती झाली नसल्याने आता शाळा भरणार कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : महिनाभरापूर्वी झालेल्या वादळात येथील शासकीय माध्यमिक शाळेवरील टिनपत्रे उडून गेली. महिना लोटूनही अद्याप शाळेची दुरुस्ती झाली नसल्याने आता शाळा भरणार कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महिनाभरापूर्वी तालुक्याला वादळाचा तडाखा बसला. या तडाख्यात शहरातील मुलांच्या शासकीय माध्यमिक शाळेवरील टिनपत्रे उडून गेली. परिणामी शाळेच्या सर्व वर्गखोल्या छताविना उघड्या पडल्या. ही शाळा जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अखत्यारीत येते. मात्र शाळा प्रशासनासह कुणालाच दुरुस्ती करण्यास सवड मिळाली नाही. आता शाळा सुरू होण्यास अवघा एक दिवस बाकी आहे. २६ जूनपासून शाळा सुरू होणार आहे. मात्र छत नसलेल्या वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थी बसणार कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
येत्या २६ जूनला शाळेचा पहिला ठोका पडणार आहे. तत्पूर्वी सर्व शाळांची दुरुस्ती केली जाते. शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळेत पोहोचून मुख्याध्यापक, शिक्षक शाळांची दुरुस्ती करवून घेतात. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये गेल्या काही दिवसांपासून स्वच्छता केली जात आहे. शिक्षक शाळेची दुरुस्ती करण्यात व्यस्त आहे. मात्र उमरखेडसारख्या शहरातील शाळेकडे शाळा प्रशासनासह जिल्हा परिषद, आणि पंचायत समितीचेही दुर्लक्ष होत आहे. छतच नसल्याने पावसाळ्यात वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थी बसणार तरी कसे, असा प्रश्न उपस्थित झाला.
जेथे बसायचीच सोय नाही, त्या शाळेची गुणवत्ता कशी असेल, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. तब्बल महिना लोटूनही शाळा प्रमुख व वरिष्ठांनी छत उडूनही आढावा घेतला नाही. छत अस्ताव्यस्त पडले आहे.