उमरखेड, महागावला पावसाचा तडाखा नदी, नाले तुडूंब; कुपटी येथील वाहून गेलेला युवक बचावला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 02:03 PM2021-07-22T14:03:44+5:302021-07-22T14:04:00+5:30
उमरखेड तालुक्यात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली.
यवतमाळ: बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने उमरखेड आणि महागाव तालुक्याला तडाखा दिला. दोन्ही तालुक्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहात आहे. पैनगंगा नदीलाही पूर आला आहे. उमरखेड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कुपटी येथील एक युवक नाल्याच्या पुरात वाहून गेला हाेता. मात्र त्याला वाचविण्यात यश आले.
उमरखेड तालुक्यात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे बंदी भागातील ढाणकी, गांजेगाव, बिटरगाव, कुपटी, दहागाव आदी परिसरातील नदी, नाल्यांना पूर आला. उमरखेड ते पुसद मार्गावरील दहागावनजीक नाल्याचे पाणी पुलावरून वाहात होते. त्यात कुपटी येथील विजय दत्ता इलतकर हा युवक वाहून गेला. एका झाडाच्या आश्रयाने त्याने काही काळ तग धरला. याची माहिती प्रशासनाला मिळताच प्रशासन व नागरिकांनी त्याला सुखरूप बाहेर काढले.
पावसामुळे ढाणकी ते हिमायतनगर, उमरखेड ते पुसद आदी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. उमरखेड येथून ढाणकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. पैनगंगा अभयारण्य परिसरातील ४० गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या धनोडा येथील पैनगंगा नदी काठोकाठ भरली आहे.
सहस्त्रकुंड धबधबा खळाळून वाहात आहे. या पावसामुळे उमरखेड व महागाव तालुक्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून, उमरखेडचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस, उमरखेडचे तहसीलदार आनंद देऊळगावकर परिस्थितीवर नजर ठेवून आहे.
नागरिकांनी घाबरू नये. पुलावरून पाणी वाहात असताना मार्गक्रम करू नये. सर्वांनी सुरक्षित राहावे. प्रशासन सतर्क असून सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
- आनंद देऊळगावकर, तहसीलदार, उमरखेड