उमरखेडचा पुरवठा विभाग उठला गरिबांच्या मुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:44 AM2021-05-27T04:44:08+5:302021-05-27T04:44:08+5:30
तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी रुजू होताच खासगी लोकांना तहसीलमधून हद्दपार केले होते. त्यामुळे जनतेला चांगली सेवा मिळेल, अशी ...
तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी रुजू होताच खासगी लोकांना तहसीलमधून हद्दपार केले होते. त्यामुळे जनतेला चांगली सेवा मिळेल, अशी धारणा होती. मात्र काहीही फरक न पडता उलट बाबूगिरीमुळे सामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. पैनगंगा अभयारण्याच्या बंदी भागातून गरीब, सामान्य नागरिक रोज ५० ते ६० किमीचा प्रवास करून, रोजंदारी बुडवून रेशन कार्डच्या कामासाठी उमरखेडला येतात. मात्र संबंधित लिपिक त्यांचे समाधान न करता ठरावीक एका खासगी व्यक्तीला भेटण्याचा सल्ला देत असल्याची चर्चा आहे.
तेच काम खासगी व्यक्तीकडून आल्यावर मात्र बाबूसाहेब करून देतात. यामुळे कुठे तरी पाणी मुरत आहे. खासगी व्यक्ती या कामासाठी हजारो रुपये घेत असल्याचे बोलले जाते. पुरवठा विभाग म्हणजे गरिबांचा अन्नदाता. नागरिकांना रेशन कार्ड ऑनलाइन देणे, नवीन रेशन कार्ड बनविणे, नाव वगळणे, दुय्यम रेशन कार्ड बनविणे यासाठी तहसीलमध्ये यावे लागते. मात्र, संबंधित बाबू नागरिकांवर उपकार करीत असल्याचा भावनेने बोलून काम न करताच त्यांना हुसकावून लावतो. त्यामुळे त्रस्त झालेले नागरिक खासगी एजंटच्या संपर्कात येऊन आपले काम करून घेण्याचा प्रयत्न करतात.