उमरखेडमध्येही होता दरोड्याचा प्लॅन
By admin | Published: July 22, 2016 02:02 AM2016-07-22T02:02:49+5:302016-07-22T02:02:49+5:30
समाजसेवेचे सोंग पांघरूण दरोडा घालणाऱ्या पंडित मिश्रा याची उमरखेडमधील एका व्यापाऱ्याकडे दरोड्याची योजना होती...
पोलीस तपासात निष्पन्न : पंडित मिश्रा उत्तर प्रदेशात पळून गेल्याचा संशय, शोध सुरू
यवतमाळ : समाजसेवेचे सोंग पांघरूण दरोडा घालणाऱ्या पंडित मिश्रा याची उमरखेडमधील एका व्यापाऱ्याकडे दरोड्याची योजना होती, त्यादृष्टीने त्यांनी वारंवार रेकीही केली होती, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आल्याचे सांगितले जाते.
पंडित मिश्रा हा पुसद तालुक्यातील रहिवासी आहे. सामाजिक, धार्मिक कार्यात अग्रेसर, आर्थिक मदत करणारा म्हणून त्याची प्रतिष्ठा होती. पंचक्रोशीत त्याला प्रतिष्ठित नागरिक म्हणून ओळख मिळाली असतानाच वडगाव रोड पोलिसांच्या कारवाईने त्याचा पर्दाफाश झाला. पंडित मिश्रा हा दरोडेखोरांच्या टोळीचा मास्टर मार्इंड असल्याचे पोलीस तपासात आढळून आले. यवतमाळातील दारव्हा रोडस्थित फाटक यांच्या घरी भरदिवसा पडलेल्या दरोड्याची योजना त्यानेच आखल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या टोळीतील काही सदस्यांना अटक करण्यात आली.
त्यांच्या चौकशीतून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहे. या टोळीने फाटक यांच्याकडील दरोडा यशस्वी झाल्यानंतर उमरखेडमधील एका व्यापाऱ्यावर लक्ष केंद्रीत केले होते. त्याच्या घराची रेकी करण्यात आली होती. उमरखेडमधील दरोड्याची योजना आखली जात असतानाच या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. (जिल्हा प्रतिनिधी)
प्रत्येक गुन्ह्यात वापरायचा नव-नवे सदस्य
पंडित मिश्रा हा मूळ उत्तर प्रदेशातील आहे. तो मास्टर मार्इंड निघाला. आपल्या टोळीचे सदस्य पकडले जाऊ नये, पकडले गेले तरी संपूर्ण टोळी पोलिसांच्या रेकॉर्डवर येऊ नये, म्हणून पंडित मिश्रा प्रत्येक गुन्ह्यात नवे-नवे सदस्य वापरत होता. त्याने पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गुन्हे केल्याची पोलिसांची माहिती आहे. त्याचा मेहुणा उत्तर प्रदेशातील आहे. त्यामुळे तोसुद्धा उत्तर प्रदेशात पळून गेला असावा, असा संशय पोलिसांना आहे. त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. मिश्रा याच्या टोळीचे विविध जिल्ह्यात नेमके कोण-कोण सदस्य आहेत, याचा उलगडा त्याच्या अटकेनंतरच होवू शकणार आहे. कारण प्रत्येक गुन्ह्यात वेगळे लोकल सदस्य वापरण्याच्या पॅटर्नमुळे सध्या पोलिसांच्या अटकेतील सदस्यांना अन्य जिल्ह्यातील नेमके सदस्य कोण, हे माहीत नसल्याचे सांगितले जाते.