दहावी, बारावीच्या परीक्षेवर १५ हजार शिक्षकांचा अघोषित बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 05:03 PM2018-10-30T17:03:45+5:302018-10-30T17:06:02+5:30
अनुदानाच्या मागणीसाठी जवळपास दरवर्षी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक परीक्षेवर बहिष्काराची भाषा करतात. मात्र, यंदा विभागातील चक्क ‘फुल्ल पगारी’ शिक्षकांनीच अघोषित बहिष्काराचा पवित्रा घेतला आहे.
अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अनुदानाच्या मागणीसाठी जवळपास दरवर्षी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक परीक्षेवर बहिष्काराची भाषा करतात. मात्र, यंदा विभागातील चक्क ‘फुल्ल पगारी’ शिक्षकांनीच अघोषित बहिष्काराचा पवित्रा घेतला आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी परीक्षक, नियामक होण्यासाठी बोर्डाने माहिती मागवूनही १५ हजार शिक्षकांनी नकार दर्शविला आहे. त्यामुळे बोर्डही पेचात पडले आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे पेपर तपासण्यासाठी दरवर्षीच शिक्षक अनुत्सुक असतात. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दरवर्षी शाळांकडून शिक्षकांची माहिती मागविते आणि अशा शिक्षकांना पेपर तपासणीचे काम सोपविते. मात्र, बहुतांश शिक्षक या कामाला नकार कळवितात. त्यावर उपाय म्हणून यंदा अमरावती विभागीय मंडळाने शिक्षकांकडूनच स्वेच्छेने नोंदणी करवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी शिक्षकांपर्यंत आॅनलाईन लिंकही पोहोचविली. मात्र, महिना उलटूनही शिक्षकांनी या लिंकवर माहिती भरलेली नाही.
बोर्डाने जबाबदारी दिल्यास पेपर तपासणीचे काम हे शिक्षकांना बंधनकारक असते. तो त्यांच्या सेवेचाच भाग असतो. विशेष म्हणजे, या कामासाठी अल्प का होईना मानधनही दिले जाते. तरीही पेपर तपासणीला अनेक शिक्षक नकार देतात. यंदा तर सरळ-सरळ हे काम सामूहिकरीत्याच नाकारण्यात आल्याचे चित्र आहे. अमरावती विभागात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिकविणारे २२ हजार ३०० शिक्षक आहेत. त्यासर्वांकडून बोर्डाने आॅनलाईन नोंदणीचे निर्देश दिले होते. तरीही १५ हजार ६७३ शिक्षकांनी नोंदणी टाळलेली आहे. यामुळे अमरावती विभागीय मंडळाच्या सचिवांनी यवतमाळसह अमरावती, अकोला, बुलडाणा वाशीमच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर चांगलीच नाराजी व्यक्त केली.
विद्यार्थी परीक्षेला मुकणार
ज्या शिक्षकांनी परीक्षेच्या कामासाठी नोंदणी टाळलेली आहे, त्यांच्या विरुद्ध बोर्डानेही आता कठोर पवित्रा घेतला आहे. नोंदणी टाळणाºया शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधून परीक्षेसाठी भरले जाणारे आवेदनपत्र स्वीकारण्यास बोर्डाच्या अमरावती विभागीय कार्यालयाने नकार दिलेला आहे. याबाबत विभागीय सचिवांनी शिक्षणाधिकाºयांना खरमरीत पत्र पाठविले असून अशा शाळेतील विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे व चालानही नाकारण्यात येईल, अशी तंबी दिली आहे. त्यामुळे शिक्षकांनी परीक्षेचे काम नाकारल्यास त्यांचे विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची दाट शक्यता आहे.
नोंदणी टाळणारे शिक्षक
- अकोला : २५८४
- अमरावती : ४६५४
- बुलडाणा : ३२८४
- यवतमाळ : ३३४१
- वाशीम : १८१०