उघड उघड कॉप्या, तरी पथके म्हणतात ‘नील’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 10:07 PM2019-03-05T22:07:05+5:302019-03-05T22:08:06+5:30

दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला अनेक केंद्रांमध्ये उघड उघड कॉपीचा प्रकार घडला, तरी शिक्षण विभागाच्या भरारी पथकांनी मात्र एकही कॉपी बहाद्दर सापडला नसल्याचा आव आणला आहे. मंगळवारच्या प्रकाराने कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले.

Unclaimed, though the squares are called 'Neel' | उघड उघड कॉप्या, तरी पथके म्हणतात ‘नील’

उघड उघड कॉप्या, तरी पथके म्हणतात ‘नील’

googlenewsNext
ठळक मुद्देकॉपीमुक्तीचा फज्जा : चिचघाट आश्रमशाळेत शिक्षकांनी पुरविल्या कॉप्या

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला अनेक केंद्रांमध्ये उघड उघड कॉपीचा प्रकार घडला, तरी शिक्षण विभागाच्या भरारी पथकांनी मात्र एकही कॉपी बहाद्दर सापडला नसल्याचा आव आणला आहे. मंगळवारच्या प्रकाराने कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले.
गेल्या दोन वर्षांपासून शिक्षण विभागाने कॉपी मुक्त परीक्षा अभियानाचा मोठा गाजावाजा केला. हे अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असताना शिक्षकच या अभियानाला आग लावताना मंगळवारी पाहायला मिळाले. यवतमाळलगतच्या चिचघाट येथील आश्रमशाळेच्या परीक्षा केंद्रावर मंगळवारी इंग्रजीचा पेपर होता. यावेळी अनेक विद्यार्थ्यांना खुद्द शिक्षकांनीच पेपर सोडवून दिला. तर काही शिक्षक चक्क विद्यार्थ्यांना कॉपी नेऊन देत होते. हा प्रकार इतका बिनधास्त घडत होता की, जागरूक नागरिकाने आपला गैरप्रकार मोबाईलमध्ये छायाचित्रे घेऊन चव्हाट्यावर आणला, याचेही कुणाला भान नव्हते.
एकीकडे हा प्रकार घडत असताना शिक्षण विभागाने जिल्हाभरात पाठविलेल्या भरारी पथकांनी मात्र सायंकाळी ‘नील’चा शेरा दिला. जिल्ह्यातील एकाही केंद्रावर एकही कॉपी बहाद्दर पकडण्यात आला नाही. त्यामुळे चिचघाटमधील प्रकार ‘सामूहिक सहमती’ने तर घडला नाही ना, असा संशय जागरूक नागरिक व्यक्त करीत आहे. चिचघाटची आश्रमशाळा यवतमाळपासून जवळ असल्याने अनेक जण इथे बदली मागून घेतात. यवतमाळवरून अप-डाउन करतात. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी अधीक्षक वगळता येथे एकही कर्मचारी नसतो.

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने नुकतीच आश्रमशाळांची गुणवत्ता चाचणी घेतली होती. त्यात गुणवत्ता ढासळल्याचे दिसल्याने शिक्षकांवर कारवाईचे हत्यारही उपसले होते. येथे येणाऱ्या गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याऐवजी कॉप्या पुरवून पास करून देण्याचा प्रयत्न शिक्षक करताना दिसले. त्यामुळे ही विद्यार्थ्यांची एक प्रकारे फसवणूक असल्याचे जागरूक नागरिकांचे म्हणणे आहे.

या केंद्रात ४०३ विद्यार्थी परीक्षा देत आहे. मंगळवारी कॉपीचा प्रकार मला तरी आढळला नाही. येथे ठाणेदारांसह दोन-तीन पोलीस कर्मचारी तैनात होते, त्यामुळे कॉपीचा प्रश्नच उद्भवत नाही. इन्व्हीजीलेटरचे मोबाईलही आम्ही ताब्यात घेतले होते.
- सीमा वाघमारे, मुख्याध्यापिका, चिचघाट आश्रमशाळा

Web Title: Unclaimed, though the squares are called 'Neel'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा