आर्णीत शिक्षकांचे बेमुदत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 11:55 PM2018-05-15T23:55:52+5:302018-05-15T23:55:52+5:30
गेल्या नऊ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नक्षलभत्त्याची रक्कम पंचायत समितीला प्राप्त होऊनही ती शिक्षकांना प्राप्त झाली नाही. त्यामुळे येथील पंचायत समितीसमोर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाने मंगळवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : गेल्या नऊ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नक्षलभत्त्याची रक्कम पंचायत समितीला प्राप्त होऊनही ती शिक्षकांना प्राप्त झाली नाही. त्यामुळे येथील पंचायत समितीसमोर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाने मंगळवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन मागे घेणार नसल्याची घोषणा संघाचे जिल्हाध्यक्ष राजुदास जाधव यांनी केली आहे.
जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात कार्यरत शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना १५ टक्के किंवा दीड हजार रूपये प्रोत्साहन भत्ता दिला जातो. हा भत्ता गेल्या नऊ वर्षांपासून एकाच रकमेवर स्थीर ठेवण्यात आला होता. शिक्षक संघाने नंतर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे थकबाकीसह नक्षलभत्ता अदा करण्याचा निर्णय दिला. न्यायालयाचे आदेश असूनही जिल्हा परिषद प्रशासनाने भत्ता देण्यास टाळाटाळ केली. अखेर संघाचे जिल्हाध्यक्ष राजुदास जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा परिषदेने पंचायत समितीला थकबाकीची रक्कम उपलब्ध करून दिली. त्याला दीड महिना लोटूनही शिक्षकांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही.
आता शिक्षक संघाने नक्षलभत्ता थकबाकी व दोन महिन्यांचे वेतन तत्काळ अदा करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून पंचायत समितीसमोर बेमुदत आंदोलन सुरू केले. जोपर्यंत थकबाकीची रक्कम मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा राजुदास जाधव यांनी दिला. उपोषण मंडपाला गटशिक्षणाधिकारी रावसाहेब जुमनाके, सभापती सूर्यकांत जयस्वाल आदींनी भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली असता त्यांनी हा इशारा दिला. या उपोषणात कार्याध्यक्ष सुरेश पवार, सचिव गजानन ठाकरे, बबन मुंडवाईक, नुरूल्ला खान, विश्वंभर उपाध्ये, रवी चिद्दरवार, महेश ुदुल्लरवार, आसाराम चव्हाण, सुधीर कोषटवार, सुनील लिंगावार, रामप्रकाश पवार, संदीप जाधव, राहुल गजभिये, भास्कर डहाके, ईश्वर चव्हाण, विनोद शिंदे, शमशोद्दीन भाटी, पवन राऊत आदी शिक्षक सहभागी झाले आहे.