रुग्णाला भेटून परतणाऱ्या मित्रांवर काळाचा घाला; अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2022 02:55 PM2022-09-02T14:55:42+5:302022-09-02T15:00:23+5:30
केळझरजवळ अपघात : मृत दोघेही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात होते कंत्राटदार
यवतमाळ : मित्राच्या पत्नीला हृदयरोग तज्ज्ञाकडे नागपूर येथे उपचारार्थ दाखल केले. त्यांची भेट घेण्यासाठी चार जण यवतमाळातून नागपूरला गेले. परत येत असताना त्यांच्या वाहनाला केळझरजवळ अपघात झाला. अनियंत्रित कार उभ्या ट्रकवर आदळली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहे. ही घटना बुधवारी रात्री ८.३० वाजता दरम्यान घडली. मृत्यू झालेले दोघेही जीवन प्राधिकरणात कंत्राटदार म्हणून काम करीत होते. अतिशय शोकाकुल वातावरणात गुरुवारी त्या दोघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आदेश्वर महादेव खुणकर (५५, रा. सद्गुरूनगर, आर्णी रोड, यवतमाळ), गजानन सरदार (५४, रा. भारती अपार्टमेंट, दारव्हा रोड, यवतमाळ) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही जीवन प्राधिकरणामध्ये शासकीय कंत्राटदार म्हणून काम करीत होते. त्यांचा कंत्राटदार मित्र सुनील थोटे यांच्या पत्नीची प्रकृती बिघडली. अँजिओप्लास्टी करण्यासाठी त्यांना नागपूर येथे दाखल करण्यात आले होते. त्यांची भेट घेण्यासाठी आदेश्वर खुणकर, गजानन सरदार, अतुल घोडे हे नागपूरला गेले.
तेथून परत येत असताना केळझरजवळ त्यांची कार उभ्या ट्रकवर धडकली. यात कार चालवित असलेले गजानन सरदार, आदेश्वर खुणकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुनील थोटे व अतुल घोडे या दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात दोन कंत्राटदार मित्र गमावल्याचा धक्का यवतमाळातील कंत्राटदारांना बसला. शोकमग्न वातावरणात दोघांवरही अंत्यसंस्कार पार पडले.