कृषी फिडरवर अघोषित भारनियमन कायमच
By admin | Published: September 17, 2015 03:11 AM2015-09-17T03:11:32+5:302015-09-17T03:11:32+5:30
कृषी फिडरवर महिनाभर २४ तास सलग वीज पुरवठा देण्याचे ऊर्जा मंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले असून आजही जिल्ह्यात तब्बल १६ तासांचे भारनियमन होत आहे.
शेतकरी हवालदिल : ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले
यवतमाळ : कृषी फिडरवर महिनाभर २४ तास सलग वीज पुरवठा देण्याचे ऊर्जा मंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले असून आजही जिल्ह्यात तब्बल १६ तासांचे भारनियमन होत आहे. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यातून पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
जिल्ह्यात यावर्षी अपुरा पाऊस असला तरी पीक स्थिती उत्तम आहे. हवा तेव्हा आणि हवा तसा पाऊस कोसळल्याने सोयाबीन आणि कपाशीचे पीक चांगलेच बहरले आहे. मात्र गत महिनाभरापासून पावसाने दडी मारली. उन्ह उन्हाळ्यासारखे तापत आहे. अशा स्थितीत पिकांना पाणी देण्याची गरज आहे. मात्र कृषी फिडरवर अनियमित वीज पुरवठा होत असल्याने ओलित करणे अशक्य झाले. याबाबत शेतकऱ्यांनी पालकमंत्री संजय राठोड यांना माहिती दिली. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली. त्यानुसार पालकमंत्री राठोड यांनी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांची मुंबईत भेट घेऊन जिल्ह्यातील विजेची समस्या सांगितली. त्यावेळी ऊर्जामंत्र्यांनी महिनाभर २४ तास वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र हा शब्द पाळलाच गेला नाही. आजही कृषी फिडरवर तब्बल १६ तासांचे अघोषित भारनियमन होत आहे. शेतकरी आक्रमक झाले असून गावागावातील शेतकरी आता वीज वितरणवर धडकत आहे. वीज वितरणमध्ये तक्रारींचा पाऊस पडत आहे. परंतु त्यानंतरही भारनियमन जैसे थेच आहे. जिल्ह्यात तीन दिवस दिवसा आणि इतर दिवस रात्री वीज पुरवठा करण्याचे वेळापत्रक आजही कायम आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे होणाऱ्या पिकांची नुकसानभरपाई कोण देणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहे. (शहर वार्ताहर)