जिल्हा परिषदेत बांधकाम दुरुस्तीची देयके पडून
By admin | Published: April 23, 2017 02:30 AM2017-04-23T02:30:49+5:302017-04-23T02:30:49+5:30
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्र. १ अंतर्गत देखभाल व दुरुस्तीची सुमारे २० लाखांची देयके दोन महिन्यांपासून प्रलंबित पडून आहे.
सुमारे २० लाख : कंत्राटदारांच्या येरझारा, अभियंत्यांची मनधरणी
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्र. १ अंतर्गत देखभाल व दुरुस्तीची सुमारे २० लाखांची देयके दोन महिन्यांपासून प्रलंबित पडून आहे. ती मंजूर व्हावी म्हणून संबंधित तालुक्यातील लहान-मोठी कंत्राटदार मंडळी बांधकाम कार्यालयात येरझारा मारुन अभियंत्यांची मनधरणी करताना दिसत आहेत.
गेल्या पावसाळ्यानंतर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्र. १ अंतर्गत यवतमाळपासून वणीपर्यंत समाविष्ठ तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात डागडुजी व देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आली होती. पूरहानीच्या या सुमारे २० लाखांच्या कामांवर छोट्या कंत्राटदारांनी आपल्या जवळची रक्कम गुंतविली होती. पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजविण्याची ही कामे बांधकाम अभियंत्यांनी सांगताच तत्काळ पूर्ण केली गेली. परंतु अद्यापही या कंत्राटदारांची देयके मंजूर झालेली नाही. फेब्रुवारीमध्येच ही देयके मंजूर होणे अपेक्षित होते. मात्र मार्च संपूनही ही ६०-७० देयके अभियंत्यांच्या टेबलवरच पडून असल्याचे सांगितले जाते. ही देयके निघावी म्हणून कंत्राटदार मंडळी दररोज बांधकाम विभाग क्र. १ च्या संबंधित अभियंता कार्यालयात येरझारा मारत आहे. मात्र तेथे त्यांना तासन्तास बसून ठेवले जाते. प्रत्यक्षात अद्यापही देयकाची रक्कम पदरी पडली नाही. ‘अर्थ’कारणासाठी ही देयके रोखून धरल्याची चर्चा कंत्राटदारांमध्ये आहे. (प्रतिनिधी)