टिप्परखाली सापडून चिमुरडीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 10:31 PM2018-03-29T22:31:36+5:302018-03-29T22:31:45+5:30
आॅटोतून उतरून रस्ता पार करताना एक नऊ वर्षीय बालिकेचा टिप्परखाली सापडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास वणी-वरोरा मार्गावरील नायगाव (निपाणी) फाट्याजवळ घडली.
ऑनलाईन लोकमत
वणी : आॅटोतून उतरून रस्ता पार करताना एक नऊ वर्षीय बालिकेचा टिप्परखाली सापडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास वणी-वरोरा मार्गावरील नायगाव (निपाणी) फाट्याजवळ घडली.
तनुश्री मनोज ठाकरे असे मृत बालिकेचे नाव आहे. या घटनेनंतर नायगाव फाट्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. चालक व मालकाला घटनास्थळी हजर करा, या मागणीसाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. दरम्यान, वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांची समजूत काढली. अपघातानंतर टिप्परच्या चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. सायंकाळी उशिरापर्यंत तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. वणी येथील रहिवासी असलेली मनोज ठाकरे यांची कन्या तनुश्री येथील सुशगंगा पब्लिक स्कूलची तिसºया वर्गाची विद्यार्थिनी होती. गुरूवारी नायगाव येथे नातलगांकडे कार्यक्रम असल्याने ती तिच्या आजोबांसोबत आॅटोने नायगाव फाट्यावर पोहोचली. आॅटो थांबल्यानंतर आजोबा आॅटोचालकाला पैसे देत असतानाच तनुश्रीने आॅटोतून खाली उडी घेतली व धावतच रस्ता पार करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान या मार्गावरून रेती भरून येत असलेल्या भरधाव टिप्परने तिला धडक देऊन दूरवर फरफटत नेले. या दुर्घटनेत गंभीररित्या जखमी होऊन तनुश्रीचा जागीच मृत्यू झाला.