गावातल्या बेरोजगारांना गावातच मिळणार रोजगाराचे धडे; शिवराज्याभिषेक दिनी प्रारंभ  

By अविनाश साबापुरे | Published: May 22, 2023 07:19 PM2023-05-22T19:19:28+5:302023-05-22T19:19:39+5:30

ग्रामपंचायतींमध्ये हा कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जाणार असून त्याचे उद्घाटन येत्या शिवराज्याभिषेकदिनी म्हणजे ६ जून रोजी होण्याची शक्यता आहे.

unemployed in the village will get employment lessons in the village itself Commencement on Shiva Rajabhishek day | गावातल्या बेरोजगारांना गावातच मिळणार रोजगाराचे धडे; शिवराज्याभिषेक दिनी प्रारंभ  

गावातल्या बेरोजगारांना गावातच मिळणार रोजगाराचे धडे; शिवराज्याभिषेक दिनी प्रारंभ  

googlenewsNext

यवतमाळ : काम करण्याची इच्छा आहे. पण, आमच्या खेड्यात संधीच नाही. अन् गाव सोडून दूर जाण्याची तयारी नाही, अशी अनेक तरुणांची परिस्थिती आहे. पण, यावरही आता तोडगा निघणार आहे. गावातल्या बेरोजगारांना गावातच स्वयंरोजगाराचे, छोट्या उद्योगाचे धडे मिळणार आहेत. ग्रामपंचायतींमध्ये हा कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जाणार असून त्याचे उद्घाटन येत्या शिवराज्याभिषेकदिनी म्हणजे ६ जून रोजी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील निवडक ५०० ग्रामपंचायतींमध्ये हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. ‘कौशल्यपूर्ण भारत’ ही पंतप्रधानांची संकल्पना साकारण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींमध्ये ‘कौशल्य विकास कार्यक्रम’ राबविण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली. त्यानुसार कौशल्य, रोजगार, उद्योजकता विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सर्व सरपंचांना पत्र पाठवून या उपक्रमात सहभागाचे आवाहन केले होते. प्रत्यक्ष ग्रामपंचायतींकडूनच या उपक्रमात सहभागी होण्याचे प्रस्ताव जिल्हा कौशल्य विकास, रोजगार मार्गदर्शन केंद्राकडे मागविण्यात आले होते. त्यातून आता ग्रामपंचायतींच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आता ५०० ग्रामपंचायतींमध्ये तज्ज्ञांमार्फत गावातील बेरोजगारांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
 
कोणते अभ्यासक्रम शिकविणार ?
या कार्यक्रमात बेरोजगारांना टेलरिंग, डेअरी फार्मर, नाश्त्याचा व्यापार (ट्रॅडिशनल स्नॅक ॲण्ड सॅव्हरी मेकर), बीज प्रक्रिया कामगार, रेशीमशास्त्रज्ञ (सेरीकल्चरिस्ट), ऑटोमोटिव्ह इंजिन रिपेअर टेक्निशिअन, शेळी पालन, लाकूड काम (टिंबर ग्रोव्हर), पेस्टीसाइड ॲण्ड फर्टिलायझर अप्लीकेटर, पोल्ट्रीफार्म वर्कर, अगरबत्ती बनविणे, किसान ड्रोन ऑपरेटर, ॲग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर, इरिगेशन सर्व्हिस टेक्नीशिअन, टूव्हीलर सर्व्हिस असिस्टंट, ट्रॅक्टर सर्व्हिस मेकॅनिक, पिकल मेकिंग टेक्निशिअन आदी १७० अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत. इयत्ता चौथी उत्तीर्णपासून तर पदवीधारक, बीई झालेल्या तरुणांसाठी वेगवेगळे अभ्यासक्रम राहणार आहेत. तर, केवळ लिहिता वाचता येणाऱ्या नागरिकांसाठीही काही अभ्यासक्रम राहणार आहेत.
 
यवतमाळच्या २० गावांत होणार प्रशिक्षण
यवतमाळ जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. त्यासाठी आर्णी तालुक्यातील जवळा, बाभूळगावातील राणीअमरावती, दारव्ह्यातून लाडखेड, दिग्रसमधून कलगाव, घाटंजीतून खापरी आणि पारवा, कळंबमधून जामडोह, पांढरकवड्यातून पाटणबोरी, महागावातून काळी दौ., मारेगावातून वेगाव, नेरमधून सोनवाढोणा व इंद्रठाणा, पुसदमधून शेंबाळपिंपरी, राळेगावातून झाडगाव, उमरखेडमधून मुळावा, वणीतून चिखलगाव, तर यवतमाळ तालुक्यातून तिवसा व हातोला या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.
 
कौशल्य विकास कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ग्रामपंचायतींकडून मोठ्या प्रमाणात प्रस्ताव प्राप्त झाले. ते प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आले. जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींची या कार्यक्रमासाठी निवड झाली असून लवकरच राज्यस्तरीय उद्घाटन होणार आहे. - विद्या शितोळे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ.

Web Title: unemployed in the village will get employment lessons in the village itself Commencement on Shiva Rajabhishek day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.