‘पात्रते’त बेरोजगार पास, गुरुजी नापास!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 04:58 AM2019-12-30T04:58:24+5:302019-12-30T04:58:33+5:30
टीईटीचा तिढा; अनुत्तीर्णांचे पगार थांबणार
- अविनाश साबापुरे
यवतमाळ : विद्यार्थी परीक्षेत नापास होऊ नये म्हणून शिक्षक झटत असतात. पण ‘टीईटी’ परीक्षेत हजारो शिक्षकच नापास झाल्याचे वास्तव आहे. एक दोनदा नव्हे, तब्बल १८ वेळा गुरुजींना संधी मिळाली, तरी टीईटी पास होऊ शकले नाही. उलट, याच परीक्षांमधून आतापर्यंत ६९ हजार बेरोजगार डीएड, बीएडधारक मात्र उत्तीर्ण झाले. टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांच्या सेवासमाप्तीचे आदेश देताना खुद्द शिक्षण संचालकांनीच ही आकडेवारी जाहीर केली आहे.
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या निर्देशानुसार, कोणत्याही शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्यांना ‘टीईटी’ (शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. १३ फेब्रुवारी २०१३ पासून राज्यात ही सक्ती करण्यात आली आहे. मात्र २०१३ नंतर रुजू झालेल्यांपैकी जवळपास ८ हजार शिक्षक आजवर टीईटी उत्तीर्ण होऊ शकलेले नाहीत. आता अशा शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी २४ डिसेंबर रोजी बजावले आहेत. तर ज्या खासगी शिक्षण संस्था अशा शिक्षकांना यापुढे कायम ठेवतील, त्यांचे शासकीय अनुदान १ जानेवारीपासून थांबविण्याचा इशाराही या आदेशात देण्यात आला आहे. हा आदेश मागे घेऊन शिक्षकांच्या नोकºया वाचविण्याची मागणी शिक्षण मंत्र्यांकडे केली जात आहे. तर दुसरीकडे शिक्षकांना पुरेशा प्रमाणात संधी देण्यात आल्याचा दावा शिक्षण विभागाकडून केला जात आहे.
गुरुजींनी गमावल्या १८ संधी
२ फेब्रुवारी २०१३ पासून प्राथमिक शिक्षकांना टीईटी बंधनकारक करण्यात आली. तेव्हापासून आजवर १८ वेळा टीईटी परीक्षा झाली. यात पाच वेळा राज्यस्तरीय टीईटी झाली. तर १३ वेळा केंद्रीय टीईटी (सी-टीईटी) पार पडली. दुसरीकडे ६९ हजार ७०६ बेरोजगार विद्यार्थी मात्र टीईटी उत्तीर्ण झाले आहेत.
टीईटीचा लेखाजोखा
परीक्षेची तारीख : उत्तीर्ण विद्यार्थी
१५ डिसेंबर २०१३ : ३१ हजार ७२
१४ डिसेंबर २०१४ : ९ हजार ५९५
१६ जानेवारी २०१६ : १९ हजार ३६२
२२ जुलै २०१७ : ९ हजार ६७७
२०१६ मध्ये फेरपरीक्षा झाली होती.