राज्यातील बेरोजगार शिक्षकांनी केले ‘डिग्री जलाव’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 06:34 PM2020-07-10T18:34:57+5:302020-07-10T18:36:11+5:30
शुक्रवारी बेरोजगार उमेदवारांनी राज्यभरात ‘डिग्री जलाव’ आंदोलन केले. यावेळी आपल्या पदव्यांच्या सत्यप्रती जाळून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पवित्र पोर्टलद्वारे रखडलेली शिक्षक भरती पूर्ववत सुरू करावी, यामागणीसाठी शुक्रवारी बेरोजगार उमेदवारांनी राज्यभरात ‘डिग्री जलाव’ आंदोलन केले. यावेळी आपल्या पदव्यांच्या सत्यप्रती जाळून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.
डीटीएड, बीएड स्टुडंड असोसिएशनच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात आले. लॉकडाऊनच्या निकषांमुळे उमेदवारांनी आपल्या घराच्या परिसरातच पदवीची सत्यप्रत्य जाळून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल केला. तर मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्त यांना मेल करण्यात आले. राज्यातील रखडलेली शिक्षकभरती सुरू करणे, शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करणे, ५० टक्के मागासवर्गीय पदकपात, बीएमसीमधील रिजेक्ट उमेदवारांना न्याय देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या.
शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा संघटनेच्या वतीने आगामी काळात यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष मगर, उपाध्यक्ष, संदीप कांबळे, अर्चना सानप, सचिव प्रशांत शिंदे पाटील, सरचिटणीस विजयराज घुगे, दत्ता काळे, संघटक वैभव फटांगरे, शरद पिंगळे पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य अश्विनी कडू, रुपाली पवार, वैभव गरड, तुषार देशमुख, विश्वास घोडे पाटील, स्वाती तौर, राम जाधव यांनी दिला.