दुर्दैवी घटना... झाडावरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू
By विलास गावंडे | Published: September 17, 2023 02:21 PM2023-09-17T14:21:19+5:302023-09-17T14:25:44+5:30
डोंगरखर्डातील घटना : जनावरांसाठी चारा तोडताना कोसळले
विलास गावंडे, डोंगरखर्डा (यवतमाळ) : जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्यासाठी शेतशिवारात गेलेल्या शेतकऱ्याचा झाडावरून पडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास डोंगरखर्डा (ता.कळंब) येथे घडली. रामा पांडुरंग ठाकरे (५१), असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
या शेतकऱ्याकडे सात एकर शेती आहे. सोबत त्यांनी शेळ्याही पाळल्या आहे. चारा आणण्याकरिता ते सकाळीच लगतच्या शेतशिवारात गेले. झाडावर चढून चारा तोडत असताना खाली पडले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. या प्रकाराची माहिती होताच त्यांना मेटीखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार यवतमाळ येथे हलविताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. शासकीच रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले.
शेतीसोबतच ते शेळीपालनही करत होते. शिवाय हॉटेलमध्ये भट्टीमास्तर म्हणून काम करायचे. यावरच त्यांचा उदरनिर्वाह होता. मेहनती म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. त्यांच्या मागे मागे पत्नी, मुलगा, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे. रामा यांच्या अपघाती मुत्यूमूळ या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.