दुर्दैवी! पुतण्याच्या वरातीआधीच निघाली काकांची अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2023 08:24 PM2023-06-10T20:24:47+5:302023-06-10T20:25:14+5:30
Yawatmal News शुक्रवारी पुतण्याला हळद लागली आणि शनिवारी पहाटे मोठ्या वडिलांचा मृत्यू झाला. पुतण्याच्या वरातीआधीच मोठे वडील गेल्याने लग्नघरी शोककळा पसरली.
यवतमाळ : नेर तालुक्यातील मांगलादेवी येथे खवले कुटुंबात मुलाचे लग्न ठरले होते. ११ जून रोजी नेर येथे लग्न सोहळा होणार होता. मात्र, शुक्रवारी पुतण्याला हळद लागली आणि शनिवारी पहाटे मोठ्या वडिलांचा मृत्यू झाला. पुतण्याच्या वरातीआधीच मोठे वडील गेल्याने लग्नघरी शोककळा पसरली.
वासुदेवराव खवले (७३) असे काळाने झडप घातलेल्या मोठ्या वडिलांचे नाव आहे. वासुदेवराव यांचे लहान बंधू मुरलीधरराव खवले यांचा मुलगा राहुल याचे नेर येथील फोपसे कुटुंबातील मुलीशी लग्न जुळले होते. रविवार ११ जून रोजी नेर येथील एका मंगल कार्यालयात लग्नाचा मुहूर्त निघाला होता. त्यामुळे गुरुवारपासूनच खवले यांच्या लग्नघरी आनंदात तयारी सुरू होती. पाहुण्यांचे आगमन सुरू झाले होते. सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना शुक्रवारी वर राहुल याच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला. मोठ्या उत्साहाने नातेवाईक हळदीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. रात्री उशिरा सर्वजण झोपी गेले. मात्र, शनिवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास आक्रित घडले.
पहाटेच्या सुमारास वर राहुल याचे मोठे वडील वासुदेवराव खवले यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे सर्व कुटुंबीय आणि नातेवाईक जागे झाले. मात्र, काही कळायच्या आतच वासुदेवराव यांनी जगाचा निरोप घेतला. पुतण्याची वरात निघण्याच्या आदल्या दिवशीच त्यांची अंत्ययात्रा काढण्याची वेळ खवले कुटुंबावर ओढवली. घरात मंगल कार्य असल्याने नातेवाईक व कुटुंबीयांनी या दु:खाच्या प्रसंगात शनिवारीच मोठ्या जड अंत:करणाने वासुदेवराव यांचा अंत्यविधी पूर्ण केला. लग्न ठरले असल्याने नाईलाजाने शनिवारी सर्व विधी पूर्ण करावे लागले. मात्र, वासुदेवराव यांच्या निधनाने संपूर्ण खवले कुटुंब आणि नातेवाइकांवर दु:खाचा पहाड कोसळला.
साधेपणाने होणार विवाह
वासुदेवराव खवले यांचे निधन झाल्याने रविवार ११ जून रोजी अत्यंत साधेपणाने नेर येथे लग्नविधी पूर्ण करण्याचा निर्णय खवले आणि फोपसे कुटुंबीयांनी घेतला आहे. त्यानुसार रविवारी नियोजित मुहूर्तावर लग्नाचे विधी केले जाणार आहेत. वासुदेवराव यांनाही एकुलता एक कैलास नामक मुलगा आहे. वासुदेवराव एसटी महामंडळामध्ये वाहकाची सेवा करून निवृत्त झाले होते. त्यांच्या निधनामुळे राहुलच्या विवाहासाठी सांगितलेला बॅन्डबाजा रद्द करण्यात आला. वरातही न काढण्याचा निर्णय घेण्यात आला.