‘एसटी’ कर्मचाऱ्यांच्या पूर्ण पगारासाठी संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 05:00 AM2020-06-27T05:00:00+5:302020-06-27T05:00:10+5:30

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यापासून महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे तंत्र बिघडले आहे. मार्च महिन्याचा पगार पूर्ण दिला नाही. एप्रिलमध्ये खूप उशीर झाला आणि आता मे पेड इन जूनच्या पगाराचा तर मोठा वांदा सुरू झाला आहे. एकीकडे खूप उशीर होऊनही केवळ ५० टक्के पगार खात्यात जमा होणार आहे.

The union is aggressive for the full pay of ST employees | ‘एसटी’ कर्मचाऱ्यांच्या पूर्ण पगारासाठी संघटना आक्रमक

‘एसटी’ कर्मचाऱ्यांच्या पूर्ण पगारासाठी संघटना आक्रमक

Next
ठळक मुद्देपिळवणूक थांबवा : कामगार संघटना आणि इंटक आंदोलन करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या १०० टक्के पगारासाठी कामगार संघटना आक्रमक भूमिका घेण्याच्या पवित्र्यात आहे. दरम्यान, महिन्याची शेवटची तारीख आली तरी पगार झाला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष धुमसत आहे. मागील तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना अनियमित वेतनाचा सामना करावा लागत आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यापासून महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे तंत्र बिघडले आहे. मार्च महिन्याचा पगार पूर्ण दिला नाही. एप्रिलमध्ये खूप उशीर झाला आणि आता मे पेड इन जूनच्या पगाराचा तर मोठा वांदा सुरू झाला आहे. एकीकडे खूप उशीर होऊनही केवळ ५० टक्के पगार खात्यात जमा होणार आहे.
शासनाने सवलत प्रतिपूर्तीपोटी दिलेल्या पैशाच्या भरवशावरच कर्मचाऱ्यांचे पगार केले जात आहे. मे महिन्याच्या पगाराकरिता २७० कोटी रुपये देण्यात आले. प्रत्यक्षात पगारासाठी २४९ कोटी रुपये लागतात. यापेक्षा जास्त रक्कम मिळालेली असताना पूर्ण पगार देण्यात महामंडळाला कोणती अडचण आहे, हा प्रश्न कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. अनेक कर्मचाऱ्यांना केवळ २० ते २५ हजार रुपयांएवढे वेतन आहे. अर्धा पगार म्हणजे हातात दहा ते बारा हजार रुपये येतील. एवढ्या कमी रकमेत महिन्याचा खर्च भागवायचा कसा, याची चिंता त्यांना आहे.

प्रशासनाचा निर्णय अन्यायकारक
मुळातच एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन अत्यंत कमी आहे. कमी वेतनामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ येईल, त्यामुळे पूर्ण वेतन द्यावे, असे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी म्हटले आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतना व्यतिरिक्त खासगी कंत्राटदारांची बिले दिल्यास आंदोलन केले जाईल, असे त्यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी कायमस्वरूपी मदत करावी, असे निवेदन महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशनने मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. महामंडळाचा कारभार व्यवस्थित होईपर्यंत कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी भरीव मदत करावी, असे फेडरेशनचे मुख्य सचिव राजू भालेराव यांनी म्हटले आहे.

मान्यता प्राप्त कामगार संघटनेचे निदर्शने
मे महिन्याचे पूर्ण वेतन मिळावे, रोजंदार गट क्र.१ मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या, रोज निघणारी नवनवीन परिपत्रके आणि कामगारांची होणारी पिळवणूक याविरोधात एसटी कामगार संघटना निदर्शने करणार आहे. ३ जुलै रोजी केंद्रीय प्रमुख संघटनांनी सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरूद्ध देशव्यापी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या सद्यस्थितीत उद्भवलेल्या प्रश्नांवर निदर्शने केली जाणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी म्हटले आहे.

Web Title: The union is aggressive for the full pay of ST employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.