उमरखेडच्या डॉक्टरांची रक्षाबंधनला अनोखी ओवाळणी
By admin | Published: August 19, 2016 01:10 AM2016-08-19T01:10:25+5:302016-08-19T01:10:25+5:30
डॉक्टर म्हणजे रुग्णांकडून पैसे उकळणारा अशी काहीशी प्रतिमा समाजात निर्माण होत आहे.
सर्पदंश झालेल्या बालिकेला जीवदान : दीड लाखांचे बिल माफ, औषध विक्रेता-पॅथॉलॉजीचीही साथ
अविनाश खंदारे उमरखेड
डॉक्टर म्हणजे रुग्णांकडून पैसे उकळणारा अशी काहीशी प्रतिमा समाजात निर्माण होत आहे. मात्र उमरखेडच्या डॉक्टरांनी समाजाचा हा भ्रम आपल्या कृतीतून दूर केला. सर्पदंश झालेल्या एका बालिकेला जीवदानच दिले नाही तर तिच्या उपचार, औषध व नमुने तपासणीचे झालेले दीड लाख रुपये बिल माफ केले. रक्षाबंधनच्या दिवशी डॉक्टरमधील भावाने एका गरीब असहाय्य रुग्ण बहिणीला खऱ्या अर्थाने ओवाळणी घातली.
उमरखेड तालुक्यातील साखरा येथील सिम्पल बापूराव बडवे (१३) हिला बारा दिवसांपूर्वी सर्पदंश झाला. तिला तात्काळ उमरखेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान ती बेशुद्ध पडली. नांदेडला घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र मोलमजुरी करणारे बडवे कुटुंब नांदेडला नेण्यास असमर्थ होते. कुणाच्या तरी सांगण्यावरुन उमरखेडच्या डॉ. श्रीकांत जयस्वाल यांच्या खासगी रुग्णालयात तिला भर्ती केले. त्याठिकाणी तिच्यावर दहा दिवस उपचार करण्यात आले. डॉ. श्रीकांत जयस्वाल, डॉ. संदीप वानखेडे, डॉ. स्वप्नील अग्रवाल, डॉ. शेख गौस, डॉ. सारिका वानखेडे, डॉ. श्रीराम शिंदे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. सिम्पलचे प्राण वाचविले.
ठणठणीत बरी झाल्यावर बुधवारी तिला सुटी दिली. तिच्या उपचाराचे बिल जवळपास एक लाख रुपये झाले होते. तसेच २५ हजाराची औषधीही उधारीवरच घेतली होती. पॅथॉलॉजीचे दीपक ठाकरे व बालाजी चिंचोळकर यांचेही बिल उधारच होते. गरीब परिस्थितीमुळे बील कसे द्यायचे, असा प्रश्न बडवे कुटुंबापुढे आला. परंतु या डॉक्टरांनी आपल्यातील माणुसकीचा प्रयत्य देत तब्बल एक लाख रुपयाचे बिल माफ केले. औषधी दुकानदार आणि पॅथॉलॉजी चालकानेही पैसे घेतले नाही. रक्षाबंधनच्या दिवशी या अनोख्या ओवाळणीने परिवार भारावून गेला.
सिम्पलला मिळाले हक्काचे भाऊ
सिम्पल बडवे ही हालाखीच्या परिस्थितीत जगणारी बालिका आई-वडील रोजमजुरी करतात. तिला भाऊ नाही तीन्ही बहिणी आहेत. दरवर्षी रक्षाबंधनाला भावाची कमतरता जाणवते परंतु यावर्षीच्या रक्षाबंधनाला तिच्यासाठी देवदूत ठरणारे डॉक्टरांच्या रुपाने अनेक भाऊ मिळाले.