खेड्यापाड्यातील गुणवत्तेचे यंदाही उडणार विमान, दिवाळीत उजळणार ‘महादीप’
By अविनाश साबापुरे | Published: November 4, 2023 06:14 PM2023-11-04T18:14:52+5:302023-11-04T18:15:17+5:30
जिल्हा परिषद शाळांमध्ये सलग तिसऱ्या वर्षी अनोखी परीक्षा
यवतमाळ : शालेय अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन चिमुकल्या विद्यार्थ्यांचा गुणवत्तेला आकार देणारी महादीप परीक्षा यंदाही सलग तिसऱ्या वर्षी आयोजित केली जात आहे. मागील दोन वर्षांप्रमाणेच यंदाच्या परीक्षेतूनही गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना विमानवारी करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
यंदा ऐन दिवाळीच्या दिवसात या महादीप परीक्षेचा शुभारंभ केला जाणार आहे. त्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांच्या संयुक्त स्वाक्षरीने सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना आदेश बजावण्यात आले आहे. शाळा स्तरावर या परीक्षेच्या तीन फेऱ्या होतील. तर चौथी फेरी केंद्र स्तरावर आणि त्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरावर दोन फेऱ्यांमध्ये परीक्षा होणार आहे. या दोन फेऱ्यांमधून निवडलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावरील अंतिम परीक्षेत संधी मिळणार आहे.
महादीप परीक्षा हा यवतमाळ जिल्हा परिषदेचा संपूर्ण महाराष्ट्रात आगळावेगळा उपक्रम म्हणून ओळखला जातो. जिल्हा परिषद सेस फंडातून या परीक्षेच्या आयोजनासाठी आणि बक्षिसांसाठी तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र, भारत, जग अशा विषयांशी संबंधित सामान्य ज्ञानावर आधारित ही परीक्षा घेतली जाते. तसेच शालेय अभ्यासक्रमात उपयोगी पडतील या दृष्टीने विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, मराठी भाषा, इंग्रजी भाषा या विषयांवरील प्रश्नांचाही यात समावेश असतो. विद्यार्थ्यांना संदर्भ शोधता यावे यासाठी जिल्हा परिषदेने महादीप पुस्तिकाही प्रकाशित करून शाळांपर्यंत पोहोचविली आहे. एकंदर सात फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागते. प्रत्येक फेरीला ५० गुण असतात.
मंगळवारपासून ‘महादीप’ला प्रारंभ
येत्या मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी महादीप परीक्षेची शाळास्तरावरील पहिली फेरी होणार आहे. त्यानंतर ३० नोव्हेंबर व १२ डिसेंबर रोजी दुसरी आणि तिसरी फेरी होईल. यात पाचवी ते आठवीमधील सर्व विद्यार्थी सहभागी असतील. त्यातून निवडलेल्या प्रत्येक वर्गातील पाच विद्यार्थ्यांची केंद्रस्तरावरील परीक्षा २७ डिसेंबरला होईल. तेथून निवडलेल्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय परीक्षा ९ जानेवारी आणि १७ जानेवारी रोजी दोन फेऱ्यांमध्ये होईल. तर प्रत्येक तालुक्यातून व प्रत्येक वर्गातून निवडलेल्या पाच विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय परीक्षेसाठी यवतमाळात पाचारण केले जाईल. ही जिल्हास्तरीय परीक्षा १ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे.
२०२१-२२ पासून जिल्हा परिषदेतर्फे महादीप परीक्षेचे आयोजन केले जात आहे. यंदा विमानवारीचे बक्षीस द्यायचे का याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. परंतु मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विद्यार्थी संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. परीक्षेनंतर निश्चितच विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे.
- किशोर पागोरे, शिक्षणाधिकारी, यवतमाळ