अनोखे आंदोलन! यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजीचे नागरिक कडूलिंबाची पाने खाऊन साजरी करणार दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2021 07:32 PM2021-11-02T19:32:21+5:302021-11-02T19:43:19+5:30
Yawatmal News भूमी अभिलेख कार्यालयाच्या गलथान कारभाराचा निषेध म्हणून घाटंजी गावातील नागरिक दिवाळीच्या दिवशी खाणार कडूलिंबाची पाने.
यवतमाळ : घाटंजी येथील इंदिरा आवासमधील अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयाच्या गलथान कारभाराचा निषेध म्हणून योजनेतील शेकडो लाभार्थी नगर परिषदेचे उपाध्यक्ष शैलेश ठाकूर यांच्या नेतृत्वात आपआपल्या घरी लक्ष्मी पूजनादिवशी कडूलिंबाची पाने खाऊन दिवाळी साजरी करणार आहेत.
घाटंजी शहरातील एकूण ४६० अतिक्रमणधारकांचा डीपीआर (प्रस्ताव) मंजूर करून घेतला आहे. परंतु, आजरोजी २ वर्षे, ८ महिन्यांचा दीर्घ कालावधी लोटूनसुद्धा येथील तालुका भूमी अभिलेख कार्यालयाने सदरहू अतिक्रमित जागेची साधी मोजणीसुद्धा केली नाही. नगर पालिकेने अतिक्रमणधारकांच्या डी.पी.आर.ला मंजुरी देऊन भूमी अभिलेख कार्यालयाने त्यासंदभार्तील पत्रांकडे दुर्लक्ष केले.
या ४६० लाभार्थ्यांपैकी अनेक लाभार्थी हे आदिवासी समाजातील आहेत. शहर व तालुका हे आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा जिल्हा स्तरावर कुठलाही आढावा घेण्यात येत नाही. अतिक्रमणधारकांना पट्टे देण्याची कार्यवाही होत नाही.
घाटंजीत सिटी सर्व्हे व्हावा, या हेतूने नगरपालिकेने भूमी अभिलेख विभागाकडे आवश्यक तो रुपयांचा भरणा केला होता. त्या अनुषंगाने १ ऑक्टोबर २०१५ ला घाटंजी शहरात सिटी सर्व्हे कार्यक्रमाअंतर्गत मोजणीच्या कामाचा प्रारंभ झाला. सिटी सव्हेर्चे काम नांदेड येथील एका खासगी कंपनीला देण्यात आले. या कंपनीने मोजणीचे काम पूर्ण केले. त्यानंतर २०१७ मध्ये जिल्ह्यातील केळापूर, कळंब आणि घाटंजी येथील भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी रितसर वरील मोजणी प्रकरणांची तपासणी करून कार्यवाही पूर्ण केली आहे. परंतु, आजतागायत शहरातील कोणत्याही मालमत्ताधारकांना मिळकतपत्रिका दिली नाही.
भूमी अभिलेख कार्यालयात लावणार दिवे
अनेकदा कार्यालयात जाऊन पाठपुरावा करूनसुद्धा उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांना जागे करण्यासाठी म्हणून लक्ष्मी पूजनादिवशी भूमी अभिलेख कार्यालय, घाटंजी येथील दीप प्रज्वलित करून निषेध नोंदविण्यात येणार आहे.