कान्हाळगावात अज्ञात रोगाने १५ जनावरे दगावली
By admin | Published: January 17, 2016 02:30 AM2016-01-17T02:30:47+5:302016-01-17T02:30:47+5:30
तालुक्यातील कान्हाळगाव येथील जनावरांना अज्ञात रोगाची लागण झाली आहे. या अज्ञात रोगामुळे गेल्या आठ दिवसात या गावातील सुमारे १५ जनावरे दगावली आहेत.
मारेगाव : तालुक्यातील कान्हाळगाव येथील जनावरांना अज्ञात रोगाची लागण झाली आहे. या अज्ञात रोगामुळे गेल्या आठ दिवसात या गावातील सुमारे १५ जनावरे दगावली आहेत. लगतच्या वागदरा येथील पशु उपचार केंद्र बेवारस अवस्थेत पडून आहे.
तालुक्यातील कान्हाळगाव येथे गेल्या आठ दिवसांपासून जनावरांना अज्ञात रोगाने ग्रासले आहे. हे गाव केवळ २५० लोकसंख्येचे आहे. गावात बहुतांश शेतकरी व मजूर आहे. जवळपास प्रत्येकाकडे जनावरे आहे. मुलाबाळांप्रमाणे या जनावरांची काळजी घेतली जाते. मात्र गेल्या आठ दिवसांपासून या जनावरांवर अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे. कान्हाळगाव (वाई) हे गाव वागदरा पशु उपचार केंद्रात समाविष्ठ आहे. या पशु उपचार केंद्रात एक पशुधन पर्यवेक्षक व एक पूर्णवेळ शिपाई कार्यरत असतानाही हे उपचार केंद्र मात्र बेवारस पडून आले. त्यामुळे जनावरांवर उपचार करणे कठीण होऊन बसले आहे.
जनावरांना अज्ञात रोगाने ग्रासल्याने पशुपालक प्रचंड हादरले आहे. वागदरा येथील पशू उपचार केंद्र बेवारस असल्याने जनावरांवर उपचार होणेही दुर्लभ झाले आहे. पशु उपचार केंद्रातील एकमेव शिपाई या केंद्रात समाविष्ठ गावांमध्ये केवळ फिरताना दिसत आहे. पशुवैद्यकीय पर्यवेक्षकाचा मात्र या केंद्रात समाविष्ठ गावात किंवा केंद्रात थांगपत्ता लागत नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे पशुपालक त्रस्त झाले आहे.
गेल्या आठ दिवसात अज्ञात रोगाने गावातील १५ जनावरांचा बळी घेतला आहे. या जनावरांवर योग्य उपचार होऊ न शकल्याने शेतकरी व पशुपालकांचे लाखमोलाचे पशूधन नष्ट झाले आहे.
सध्या खरीप व रबीचा हंगाम सुरू आहे. येत्या काही दिवसात कपाशीच्या उलंगवाडीला सुरूवात होणार आहे. शेतात रबीतील हरभरा व गहू पिक उभे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना बैलांची अत्यंत गरज भासते. मात्र ऐन सुगीचा हंगाम सुरू असतानाच अज्ञात रोगाने जनावरांवर आक्रमण केल्याने काही शेतकऱ्यांचे बैलही मृत्यूमुखी पडले आहे. परिणामी या गावातील शेतकरी धास्तावून गेले आहे.
पशुपालकही संकटात सापडले आहे. त्यामुळे सर्वच चिंताक्रांत दिसत आहे. या गावातील अज्ञात रोगग्रस्त जनावरांची तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार करावे, अशी मागणी तेथील रामदास मेश्राम यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)